दगडूशेठ गणपतीची मूर्ती मराठा लाइट इन्फंट्रीला सुपूर्द:16 भैरव बटालियन अरुणाचल प्रदेश सीमेवर मंदिर स्थापन करणार

0
8c25eaa4-83ee-4494-9800-8c2f461f7047_1777032778587.jpg




श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पंचधातूची मूर्ती मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला सुपूर्द करण्यात आली. ही बटालियन अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात मंदिर स्थापन करणार आहे. संवेदनशील भागात कार्यरत राहण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेल्या या बटालियनला गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभावा, या उद्देशाने मूर्ती देण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. मराठा लाइट इन्फंट्रीला गणपती मूर्ती देण्याची जुनी परंपरा आहे. १६ भैरव बटालियननेही दगडूशेठ गणपतीची मूर्ती देण्याची विनंती केली होती, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल रणजीत सिंह सिनसिनवार यांनी सैनिकांच्या वतीने दिली. दीड फूट उंचीची पंचधातूची ही मूर्ती विधिवत पूजा करून बटालियनच्या प्रतिनिधींना प्रदान करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि राजू चिंचोरकर उपस्थित होते. बटालियन सुरुवातीला बेळगाव येथे मंदिराची स्थापना करणार आहे. त्यानंतर बटालियनच्या ऑपरेशनल तैनातीनुसार या मंदिराचे स्थलांतर अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात केले जाईल, अशी माहिती ट्रस्टने दिली. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, भारतीय लष्करातील मराठा लाइट इन्फंट्रीला ट्रस्ट नेहमीच गणपती बाप्पाची मूर्ती देत आला आहे. १६ भैरव बटालियनलाही याच परंपरेनुसार मूर्ती सुपूर्द करण्यात आली आहे. ही बटालियन ‘ऑपरेशन सिंदूर’सह विविध महत्त्वाच्या घटनांमध्ये देशाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed