'उपभोग-आधारित वृद्धी' भारतासाठी आवश्यक- अर्थमंत्री निर्मला सीतारामन:पुण्यात एसबीआयच्या अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले प्रतिपादन

0
d299f625-3855-40ab-93b2-c5517d575ee1_1777034571231.jpg




केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पुण्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘उपभोग-आधारित वृद्धी’ कायम राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पुण्याच्या खराडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) महाराष्ट्र सर्कलच्या अत्याधुनिक स्थानिक मुख्य कार्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताचा आर्थिक विस्तार प्रामुख्याने शेती आणि देशांतर्गत क्रियाकलापांवर आधारित असावा, जो जागतिक बाजारपेठांच्या गरजाही पूर्ण करू शकेल. सध्या जागतिक बाजारपेठेत मोठी उलाढाल आणि अनिश्चितता असून, त्याचा परिणाम निर्यातीवर होत आहे. तरीही, भारतीय निर्यातदारांनी नवीन बाजारपेठा शोधल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. भारताची खरी ताकद मजबूत अंतर्गत मागणी आणि उपभोग हीच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेसाठी बँकिंग क्षेत्राला तयार करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणांचा संदर्भ देत, भविष्यातील आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय बँका कशा विकसित व्हाव्यात, यासाठी लवकरच एका समितीची स्थापना केली जाईल असे त्या म्हणाल्या. ही समिती मोठ्या, कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या बँकिंग संस्थांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन करेल. बँकिंगमधील वाढत्या डिजिटलायझेशनचे स्वागत करतानाच, अर्थमंत्र्यांनी ग्राहकांशी मानवी संपर्क कायम ठेवण्याचा सल्ला दिला. ग्राहक आजही महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि वैयक्तिक संवादाला प्राधान्य देतात, असे त्यांनी नमूद केले. सीतारामन यांनी बँक अधिकाऱ्यांना स्थानिक अर्थव्यवस्थेची सखोल समज विकसित करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील, विशेषतः पूर्व भागातील लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) पाठबळ देण्याची आणि जुन्या औद्योगिक क्लस्टर्सना ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रादेशिक विकास हाच भारताच्या व्यापक आर्थिक ध्येयाचा आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चाल्ला श्रीनिवासुलु सेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed