पुण्यात एसीबीचा मोठा दणका!:भूजल सर्वेक्षण विभागाचे दोन अधिकारी 2 लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत
![]()
पुण्यातील भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. इमारतीच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेला भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. ही कारवाई शिवाजीनगर येथील कार्यालयात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे दिवाकर नामदेव धोटे (५३, वरिष्ठ भूवैज्ञानिक, वर्ग-१) आणि प्रियांका संदीपान घुले (३९, कनिष्ठ भूवैज्ञानिक, वर्ग-२) अशी आहेत. एका ४६ वर्षीय तक्रारदाराने आपल्या इमारतीच्या बांधकामाच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी पीएमआरडीएला अर्ज केला होता. यासाठी भूजल सर्वेक्षण अहवाल सादर करणे अनिवार्य होते. कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियांका घुले यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांच्यासाठी सुरुवातीला २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या लाचेच्या मागणीबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीनंतर २ लाख रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, शुक्रवारी शिवाजीनगर येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. प्रियांका घुले यांनी तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची रोकड स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या गुन्ह्यात सामील असलेले वरिष्ठ अधिकारी दिवाकर धोटे यांनाही त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे आणि अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, खंडेराव रंजवे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
