अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-24t195127964_1777040454.jpg




अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज, २४ एप्रिल २०२६ (शुक्रवार) रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संघटनांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. ‘रियल आंबेडकरवादी, समतावादी आणि संविधानवादी’ पक्ष व संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देऊन उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला. आंदोलकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासनाने कोणतीही मागणी नसताना अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेऊन या पुरोगामी राज्याला जाती-जातीत विभागण्याचे पाप केले आहे.” यावेळी आंदोलकांनी न्या. बदर समितीच्या अहवालाचा तीव्र निषेध करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपवर्गीकरणाची ही प्रक्रिया लोकशाहीला विघातक असून ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी आंबेडकरवादी संघटनांनी केली आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या १. महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) करू नये.
२. अनुसूचित जातीसह सर्वच जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
३. अनुसूचित जातीतील एकूण ५९ जातींचा सखोल अभ्यास करून राज्यव्यापी सार्वजनिक सुनावण्या घेतल्या जाव्यात.
४. अनुसूचित जातीची रिक्त पदे (बॅकलॉक) तात्काळ भरण्यात यावीत.
५. कोणताही निर्णय घेताना घाई न करता सर्व समाज घटकांची मते जाणून घ्यावीत.
६. खाजगी क्षेत्रातही अनुसूचित जातीला आरक्षण लागू करावे.
७. सार्वजनिक न केलेला न्या. बदर समितीचा अहवाल तात्काळ रद्द करावा.
८. अनुसूचित जाती व जमातींना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावेत. या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने दिपक निकाळजे, श्रावण गायकवाड, विनय चव्हाण, अशोक बोर्डे, सिद्धार्थ गंगावणे, आनंद कस्तूरे, अमित वाहूळ, वसंतराज वक्ते, सचिन जोगदंड, शैलेंद्र मिसाळ, नागेश केदारे, श्रीरंग ससाने, अरविंद कांबळे, बंटी सदाशिवे, अंबादास रगडे, रामराव दाभाडे, कृष्णा शरणागत, संजय जाटवे, सिध्दोधन मोरे, कपिल बनकर, सोनु नरवडे, दिपक सरोदे, कैलास काळे, विमल दाभाडे, शकुंतला खरात, व्हि. टी. शिरसाट, भिमराव शेंडगे, संतोष चव्हाण, सुशिल भिशे, रामेश्वर हाडूलतीकर, अनामी मोरे, सचिन सिंगाडे, संतोष खिल्लारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed