वीजग्राहकांना प्रॉम्प्ट, ऑनलाईन पेमेंटने 9.60 कोटींची सवलत:महावितरणच्या गो-ग्रीन आणि डिजिटल सेवांचा वापर वाढला

0
782fa971-c364-4450-b794-365565fd6417_1777035045467.jpg




छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांनी महावितरणच्या डिजिटल सेवांचा वापर करून मावळत्या आर्थिक वर्षात ९ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळवली आहे. प्रॉम्प्ट बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो-ग्रीन या पर्यायांचा वापर केल्याने ग्राहकांना हा लाभ मिळाला आहे. महावितरण ग्राहकांना विविध सवलती देते. यात, सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून) सुमारे १ टक्के तत्पर बिल भरणा सवलत मिळते. तसेच, नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट किंवा यूपीआय वापरून डिजिटल पद्धतीने बिल भरल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के डिजिटल बिल भरणा सवलत दिली जाते. याशिवाय, छापील बिलाऐवजी ई-मेलवर वीजबिल स्वीकारणाऱ्या गो-ग्रीन ग्राहकांना दरमहा १० रुपये, म्हणजेच वर्षाला १२० रुपयांची सवलत मिळते. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ग्राहकांनी तत्पर बिल भरणा सवलतीपोटी ५ कोटी ५७ लाख ३९ हजार ४८२ रुपये, डिजिटल बिल भरणा सवलतीपोटी १ कोटी ५८ लाख ५० हजार १६७ रुपये आणि गो-ग्रीन पर्यायामुळे २ कोटी ४४ लाख ५७ हजार ५७० रुपये अशी एकूण ९ कोटी ६० लाख ४७ हजार २१९ रुपयांची सवलत प्राप्त केली आहे. यामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ग्राहकांचा मोठा वाटा आहे. शहर मंडलातील ग्राहकांनी तत्पर बिल भरणा सवलतीपोटी ३ कोटी ४४ लाख ८४ हजार ९०० रुपये, डिजिटल बिल भरणा सवलतीपोटी ९६ लाख २२ हजार ६ रुपये आणि गो-ग्रीन पर्यायामुळे १ कोटी १३ लाख ५८ हजार ४४० रुपये अशी एकूण ५ कोटी ५४ लाख ६५ हजार ३४६ रुपयांची सवलत मिळवली आहे. महावितरणने ग्राहकांसाठी सर्व वीजविषयक सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी सर्व ग्राहकांना ऑनलाईन व प्रॉम्प्ट पेमेंट करून आणि गो-ग्रीनमध्ये नोंदणी करून या सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed