22 वर्षीय भावेश वानखडेला पहिल्याच प्रयत्नात कॅगमध्ये नोकरी:प्रतिकूल परिस्थितीतून मिळवले यश, समाजकार्य महाविद्यालयाचा गौरव

0
36de3f0f-6fbd-48db-b4ae-2e22c37fc561_1776962024099.jpg




मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथील रहिवासी भावेश वर्षा अनिल वानखडे यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्र सरकारच्या कॅग (कन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) संस्थेत लेखाधिकारी (अकाउंटंट) पदावर यश मिळवले आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी ही महत्त्वपूर्ण नोकरी मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. भावेश यांचे वडील विटभट्टीवर काम करतात, तर आई सूतगिरणीत मजूर म्हणून कार्यरत आहे. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतही भावेशने आपले स्वप्न सोडले नाही. चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांनी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित अमरावतीच्या समाजकार्य महाविद्यालयातून २०२४ मध्ये बी.एस.डब्ल्यू. ही पदवी पूर्ण केली. समाजकार्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली होती. यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. आपल्या यशाबद्दल बोलताना भावेशने सांगितले की, “मी सुरुवातीपासूनच रोजगाराच्या संधी शोधत होतो. समाजकार्य महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर या शोधाला बळकटी मिळाली. प्राध्यापकांनीही मला सतत प्रोत्साहन दिले. जिद्द कायम ठेवल्यास यश हमखास मिळते, हे मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगायचे आहे.” भावेशच्या या यशाबद्दल विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष ॲड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारिणी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पुनम चौधरी, पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड, प्रा. गजानन काळे तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed