महिला आरक्षणाला भाजपचाच विरोध:विजय वडेट्टीवार यांची टीका, म्हणाले – काँग्रेसने महिलांना राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपालपदही दिले
![]()
अमरावती येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज, गुरुवारी भाजपवर निशाणा साधला. २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायद्यात रूपांतरित झालेले महिला आरक्षण विधेयक सरकार लागू का करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. वडेट्टीवार यांच्या मते, महिला आरक्षणावरून गदारोळ करणारा भाजप स्वतःच महिला आरक्षणविरोधी आहे. याउलट, काँग्रेसने देशाला पंतप्रधान, राष्ट्रपती, पक्षाध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपाल अशी अनेक पदे देऊन महिला सक्षमीकरणाची अंमलबजावणी केली आहे. अलीकडचा काळ वगळता, भाजपची एकही महिला यापैकी कोणत्याही पदावर नव्हती, त्यामुळे भाजपचे सध्याचे आंदोलन ढोंगी असून त्यांना या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. गुरुवारी सकाळी काँग्रेस भवनात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजप ज्या पद्धतीने हा मुद्दा मांडत आहे, त्यात तथ्य नाही. एकेकाळी भाजपनेच या आरक्षणाला विरोध केला होता. राजीव गांधी यांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा प्रवास सुरू झाला, जो पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात लागू झाला. महाराष्ट्रात तर ३३ ऐवजी तब्बल ५० टक्के आरक्षण लागू करून आम्ही त्याहीपुढचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर खापर फोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांच्या मते, २०२३ मध्ये संमत झालेले महिला आरक्षण विधेयक कोणत्याही क्षणी लागू केले जाऊ शकते. परंतु भाजपने १७ एप्रिल रोजी बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात ते २०११ च्या जनगणनेशी आणि त्या आधारे केली जाणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसिमन) जोडले आहे. यात त्यांचा कपटीपणा असून, उत्तरेत आपली शक्ती वाढवताना दक्षिणेत विरोधकांची शक्ती कमी करण्याचा त्यांचा डाव आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्यांचा हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार बळवंतराव वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, ॲड. यशोमतीताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप उपस्थित होते. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असल्याने भाजपला कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसवर या मुद्द्याचे खापर फोडायचे आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली असून, आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. परंतु, ‘माझ्या तोडीचा नेता हवा’ ही त्यांची अट असल्याने, त्यांनी खुशाल सत्ता सोडावी. दरम्यानच्या काळात आम्ही यशोमतीताईंना मुख्यमंत्री करू आणि मग तोडीस तोड नेता म्हणून त्यांनी त्यांच्याशी या विषयावर बोलावे, असे वडेट्टीवार म्हणाले.
