मध्यप्रदेशातील ज्वारीची स्थानिकांच्या नावावर विक्री:मोर्शीतील प्रकार, खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी केली चौकशीची मागणी

0
800947a5-e87a-4ec4-a316-05b0d65069da_1776961543209.jpg




मोर्शी येथे ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून आणलेली ज्वारी स्थानिक शेतकऱ्यांच्या नावावर शासनाला विकली जात असून, त्यासाठी बोगस अर्ज भरले जात आहेत. मोर्शी तालुका शेतकी खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या व्यवहारामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता संघाचे संचालक बंडू साऊत, पंकज विधळे, मंगेश बोंडे, नरेंद्र रामटेके आणि संदीप रोडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत तहसीलदार सागर ढवळे यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. प्राप्त माहितीनुसार, ज्वारी खरेदी केंद्रावर बोगस अर्जांच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील ज्वारी स्थानिक शेतकऱ्यांच्या नावावर खरेदी दाखवली जात आहे. ज्वारी खरेदीबाबत कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध नसताना नोंदणीच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४०० अर्ज प्राप्त झाल्याने संशय अधिक बळावला आहे. तसेच, खरेदी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संचालक मंडळाशी कोणतीही चर्चा किंवा मंजुरी घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचा अहवाल प्रशासनानेच दिला होता. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन कसे झाले, असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित संचालकांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घोटाळ्यामुळे तालुक्यातील खरे ज्वारी उत्पादक नाराज झाले असून, त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या गंभीर आरोपांची दखल घेऊन प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed