महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक:26 एप्रिलला मतदान प्रक्रिया, अमरावतीत 2 हजार 565 डॉक्टर्स बजावणार मतदानाचा हक्क
![]()
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) १८ पैकी नऊ सदस्यांच्या निवडीसाठी रविवार, २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. अमरावती जिल्ह्यात या निवडणुकीसाठी २,५६५ डॉक्टर्स मतदार असून, त्यांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान करता येणार आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक या निवडणुकीचे मतदार आहेत. त्यांच्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात चार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी यांच्या निगराणीखाली मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्याच्या अवर सचिवांनी जारी केलेल्या राजपत्रानुसार ही निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ५ मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत, ज्यात एकूण २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून, दुसरे प्रशिक्षण शनिवार, २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. हे कर्मचारी त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता निवडणूक साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना होतील. मतदारांना एकूण ९ मते देण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तब्बल १६ वर्षांनंतर अमरावतीतून उमेदवार रिंगणात उतरला आहे. २००९ साली आयएमएच्या अमरावती शाखेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. उद्धव देशमुख यांनी ही निवडणूक जिंकली होती. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी आणि प्रसिद्ध वैद्यक डॉ. वसंत लुंगे हे अमरावतीचे उमेदवार आहेत. त्यांना राज्यातील १.४१ लाख वैद्यकीय मतदारांशी संपर्क साधायचा आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही १८ सदस्यीय प्राधिकारिणी आहे. यापैकी नऊ सदस्य थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात, तर उर्वरित नऊ सदस्यांपैकी पाच मानद सदस्य असतात. इतर चार सदस्यांमध्ये नाशिकचे आरोग्य विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DMER), सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन या संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असतो. ही परिषद डॉक्टरांच्या कामकाजाचे नियमन करते आणि चुका करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकारही तिला आहे.
