[ads1]
![]()
वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ आणि कडूनिंबाची झाडे लावण्याची मागणी नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या प्रमुख मार्गांवर सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या वृक्षारोपणामुळे प्रवाशांना सावली मिळण्याबरोबरच परिसरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. तसेच रस्त्याच्या सौंदर्यात भर पडून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. पिंपळ, वड आणि कडूनिंबाची झाडे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानली जातात. वृक्षलागवडीमुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, मृदा व जलसंवर्धनास तसेच जैवविविधतेच्या जतनासही मदत होते. त्यामुळे केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारीही संबंधित विभागाने निश्चित करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर विशेष वृक्षारोपण मोहीम राबवून रोपांची लागवड करणे आवश्यक आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांच्यासह अनेक नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. लावलेल्या रोपांच्या संगोपनासाठीही सहकार्य करण्यास ते तयार आहेत. वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भावी पिढ्यांना निरोगी पर्यावरण देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad