भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही:बबलू देशमुख यांचा कार्यगौरव सोहळ्यात विश्वास

[ads1]


अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रामीण) अध्यक्ष तथा जिल्हा परिषद व मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख यांनी चांदूर बाजार येथे आयोजित कार्यगौरव सोहळ्यात भाजपच्या भूलथापांना जनता यापुढे बळी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. कोणतीही सत्ता नसतानाही काँग्रेसचा कार्यकर्ता डगमगत नाही आणि आजही प्रामाणिकपणे सोबत उभा आहे, असेही त्यांनी नमूद केले. चांदूर बाजार शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीने माधान रोडवरील रघुवंशी मंगल कार्यालयात बबलू देशमुख यांच्या अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नागरी सत्कारानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप, कोठारा लेप्रसी येथील कुष्ठरुग्णांसाठी प्रीतिभोजन आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप यांचा समावेश होता. या सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अध्यक्षीय भाषणात खासदार बळवंत वानखडे यांनी बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. कोणतेही पद किंवा सत्ता नसतानाही कार्यक्रमाला एवढी मोठी गर्दी होणे हे त्यांच्या कार्याचे फलित आहे, असे ते म्हणाले. बबलू देशमुख हे सातत्याने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि अहोरात्र जनतेसाठी काम करतात, त्यामुळेच कार्यकर्त्यांची त्यांच्यावरील निष्ठा आजही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, डॉ. रवींद्र वाघमारे, रावसाहेब लंगोटे, प्रमोद दाळू, प्रताप किटूकले, विलास बोरेकार, गणेशराव बेलसरे, अरविंद लंगोटे, रमेशराव घुलक्षे, महेरुला भाई, बाबूभाई इनामदार, प्रमोदराव घुलक्षे, योगेशराव पवार, किशोर देशमुख, एहतेशाम नबील, नामदेवराव तनपुरे, राहुल गवई, उत्कर्ष देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील पदाधिकारी तसेच काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यात सहभागी झाले होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *