नेरपिंगळाईत 'चलो दिल्ली' अभियानासाठी जनजागरण सभा:भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतली; महिला, युवक, शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती

[ads1]


भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर नेरपिंगळाई येथील गणेश चौकात जनजागरण सभेचे आयोजन केले. या सभेला महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. ‘बदलाव जरूरी है… चलो दिल्ली!’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी नेत्यांनी तरुणाईसमोरील बेरोजगारी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यावर जनजागृती केली. महिलांची सुरक्षितता, सामाजिक समानता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरही कार्यक्रमातून भाष्य करण्यात आले. प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी शेती आणि शेतीच्या अर्थकारणाचा सविस्तर आढावा घेतला. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाच्या भावातील अनिश्चितता, बाजारपेठेतील अडचणी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कशी बिकट होत आहे, याचे वास्तव चित्र त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर यांनी पक्षाच्या जडणघडणीचा इतिहास सांगितला. तसेच, देशातील सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या संघर्षाची माहितीही त्यांनी दिली. सध्या देशासमोर महागाई, बेरोजगारी, शेतीचे संकट, शिक्षण व आरोग्याशी संबंधित प्रश्न, महिला सुरक्षितता, जातीयवाद आणि भ्रष्टाचार यांसारखी अनेक आव्हाने आहेत. या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवण्याची गरज वक्त्यांनी स्पष्ट केली. ‘बदलाव जरूरी है’ हा नारा जनतेच्या प्रश्नांशी जोडून व्यापक जनजागृती आणि संघटित संघर्ष उभारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या जनजागरण सभेच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. समविचारी राजकीय पक्ष आणि मित्रपक्षांनीही सहकार्य करून सहभाग नोंदवल्याने कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. उपस्थितांनी क्रांतिकारी गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘बदलाव जरूरी है’, ‘चलो दिल्ली’ आणि जनतेच्या हक्कांच्या संघर्षाच्या घोषणा दिल्या. यावेळी शाहीर धम्मा खडसे यांच्या क्रांतिकारी कलापथकाने उपस्थितांना भारावून टाकले. देशातील अराजकता, वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थी व तरुणांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, जातीयवाद आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांचा त्यांनी आपल्या प्रभावी गीतांमधून परखड समाचार घेतला. त्यांच्या गीतांमधून जनतेच्या प्रश्नांना आवाज देत अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *