राज्यातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या:जी. श्रीकांत 15 दिवसांतच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये, विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार
![]()
राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ४ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महसूल, सिडको आणि जीएसटी विभागातील प्रशासकीय समीकरणे बदलली आहेत. सलग दुसऱ्या दिवशी बदल्या करण्यात आल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. १. जी. श्रीकांत (IAS: २००९) : विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर जी श्रीकांत हे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त होते. 15 दिवसांपूर्वीच त्यांची नवी मुंबई येथे ‘जल जीवन मिशन’चे अभियान संचालक म्हणून बदली झाली होती. मात्र, जी. श्रीकांत पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली होऊन येणार असून, यावेळी त्यांच्याकडे मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जी श्रीकांत हे गेल्या पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आधी जीएसटी आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त, प्रशासक म्हणून कार्य केले आहे. त्यापूर्वी ते मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत. २. जितेंद्र पापळकर (IAS: २०१०) : सह आयुक्त, जीएसटी, मुंबई छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र पापळकर यांची बदली आता सह आयुक्त, जीएसटी, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून संभाजीनगर विभागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. ३. गंगाथरन डी. (IAS: २०१३) : अभियान संचालक, जल जीवन मिशन गंगाथरन डी. यांची नियुक्ती अभियान संचालक, जल जीवन मिशन, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आता गंगाथरन यांच्याकडे असेल. ४. जगदीश मिनियार (IAS: २०१५) : आयुक्त, महिला व बालविकास, पुणे छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोचे (नवी शहरे) मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत असलेले जगदीश मिनियार यांची आता पुणे येथे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
