पुणे जिल्ह्यात 32 हजारहून अधिक गर्भवती महिलांची नोंदणी:प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ, मोठा दिलासा
![]()
पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ३२,६४६ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही नोंदणी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या संकेतस्थळावर केली आहे. जिल्ह्यात एकूण ६,०९४ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत, ज्यात ग्रामीण भागात ४,३९५ आणि नागरी भागात १,६९९ केंद्रे आहेत. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांमध्ये पुणे महानगरपालिकेंतर्गत १०,०३४, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ३,७१०, आंबेगाव तालुक्यात ९५२, बारामतीमध्ये १,७५५, भोरमध्ये ५२३, दौंडमध्ये १,५१४, हवेलीमध्ये २,०५५, इंदापूरमध्ये १,४९४, जुन्नरमध्ये १,६६१, खेडमध्ये २,०६४, मावळमध्ये १,७१२, मुळशीमध्ये ७८८, पुरंदरमध्ये ८८४, शिरूरमध्ये १,९२६ आणि वेल्हे तालुक्यात १२४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. शहरी भागातून १,४५० नवीन लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना गरोदरपणात चांगला आहार व आरोग्य मिळावे, तसेच त्यांनी या काळात मजुरी करू नये, हा आहे. या योजनेमुळे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासही मदत होते. सन २०१७ पासून ही योजना आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत होती. आता महाराष्ट्रात जून २०२५ पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही योजना कार्यान्वित केली जात आहे. आनंद खंडागळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) यांनी सांगितले की, नवीन लाभार्थ्यांच्या नोंदीचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. उर्वरित पात्र महिलांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश साध्य करण्यासाठी विभागाकडून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे.
