DA Hike 2026 | सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ
DA Hike 2026 | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. तेलंगणा सरकारने तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (TSRTC) मधील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2.1 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे सुमारे 38,000 कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50.7% वरून 52.8% इतका झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार असून हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सरकारने ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली असून ती 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे.
मात्र, संपूर्ण थकबाकी एकाच वेळी देण्याऐवजी ती टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये पूरक बिलांच्या माध्यमातून ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
DA Hike 2026 | आर्थिक भार आणि सरकारची योजना :
या निर्णयामुळे TSRTC वर दरमहा सुमारे 2.82 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मात्र, हा भार व्यवस्थापित करण्यासाठी सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने रक्कम वितरित करण्याची योजना आखली आहे.
याआधी जुलै 2025 मध्येही सरकारने महागाई भत्त्यात 2.1% वाढ केली होती. त्या वेळी DA 48.6% वरून 50.7% करण्यात आला होता. त्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची ही सलग दुसरी मोठी घोषणा ठरली आहे.
सध्या केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या DA वाढीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, तेलंगणा सरकारने घेतलेला हा निर्णय इतर राज्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो.
