देशातील पहिला ऑलिम्पिक सायकलिंग ट्रॅक उभारण्यासाठी संभाजीनगर आघाडीवर:फेडरेशनच्या शिष्टमंडळाकडून 12 एकर जागेची पाहणी
![]()
‘मिशन ऑलिम्पिक’ अंतर्गत देशातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा सायकलिंग ट्रॅक आणि सायकलिंग खेळासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई) छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी साई केंद्रातील १२ एकर जागेची सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच सर्वंकष पाहणी केली. या प्रकल्पासाठी देशातील इतर राज्येही चढाओढ करत असली तरी ट्रॅक, रोड, बीएमएक्स आणि माउंटन बायकिंगसाठी येथील उपलब्ध जमीन व नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती अत्यंत अनुकूल असल्याने शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. या पाहणी दौऱ्यात फेडरेशनचे सरचिटणीस मनिंदर पाल सिंग, सीईओ प्रवीण पाटील, एचपीडी धर्मेंद्र लांबा, महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे सचिव संजय साठे आणि खजिनदार भिकन आंबे उपस्थित होते. ‘साई’च्या उपसंचालिका डॉ. मोनिका घुगे आणि सहायक संचालक सुमेध तरोडेकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. ट्रॅकचा अंतिम प्रस्ताव आता भारत सरकारच्या क्रीडा विभागाचे माननीय सचिव हरी रंजन राव आणि साई मुख्यालयाकडे सादर केला जाईल. हा प्रकल्प साकारल्यास देशातील हा पहिलाच परिपूर्ण ट्रॅक असेल, ज्यामुळे संभाव्य २०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताची दावेवारी अधिक भक्कम करेल. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू येणार येथे ऑलिम्पिक दर्जाचा ट्रॅक बनल्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्गज सायकलपटू सरावासाठी येतील. यामुळे स्थानिक व मराठवाड्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि दिग्गजांसोबत सरावाची संधी मिळेल. तळागाळातील गुणवत्ता शोधून त्यांना ऑलिम्पिक पोडियमपर्यंत नेण्यासाठी ही एक मोठी व अत्यंत सक्षम व्यवस्था ठरेल. गोगाबाबा टेकडीचा होणार कायापालट तरुणाईचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘गोगाबाबा टेकडी’चा या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे कायापालट होणार असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘डाऊन हिल’ ट्रॅक उभारला जाईल. पर्यटन आणि औद्योगिक शहर अशी ख्याती असलेल्या छत्रपती संभाजीनगरला आता या नव्या सुविधांमुळे पश्चिम भारतातील ‘सायकलिंगचे आंतरराष्ट्रीय हब’ म्हणून बहुमान्य ओळख प्राप्त होईल.
