दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्नपदार्थ आणि मद्याची मागणी वाढली असताना प्रशासनाने अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावेत, तसेच अवैध मद्यविक्रीला आळा बसावा यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत FDAने राज्यभरातून सुमारे 45 लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त केला आहे. दुसरीकडे, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल 85 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ठाण्यात 10 जणांना अटक करण्यात आली असून 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. FDAची राज्यभर विशेष तपासणी मोहीम दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, फरसाण, खाद्यतेल, सुका मेवा यांसह विविध खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या वाढत्या मागणीचा फायदा घेत काही विक्रेत्यांकडून निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होण्याची शक्यता असते. याला आळा घालण्यासाठी FDAने 1 ते 3 नोव्हेंबर 2026 या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली. हॉटेल्स, मिठाईची दुकाने, अन्नपदार्थ उत्पादक आणि साठवणूक केंद्रांवर अधिकाऱ्यांनी छापे टाकले. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत एकूण 45 लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. चेंबूरमध्ये बसमधून 11 लाखांची मिठाई जप्त या कारवाईदरम्यान मुंबईतील चेंबूर येथे एक महत्त्वाची बाब समोर आली. लक्झरी बसमधून अस्वच्छ परिस्थितीत मिठाईची वाहतूक केली जात असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित बसची तपासणी केली असता सुमारे 11.11 लाख रुपये किमतीचा 1 हजार 2 किलो स्वीट हलवा आणि मिठाईचा साठा आढळला. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. याशिवाय राज्यातील सात विभागांमध्ये मिठाई, खवा, फरसाण, खाद्यतेल आणि सुका मेवा अशा विविध खाद्यपदार्थांचा 22.34 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणुकीविरोधात कोकण आणि नाशिक विभागातही विशेष कारवाई करण्यात आली. पाच आस्थापनांचे परवाने निलंबित FDAच्या या विशेष मोहिमेत केवळ अन्नसाठा जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित राहिली नाही, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईही करण्यात आली. पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून एका आस्थापनाला व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांतील कारवाईत 45 लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा 11.55 लाख रुपये किमतीचा साठा आणि दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. ठाण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई एकीकडे भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात FDAने मोहीम उघडली असताना दुसरीकडे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री आणि तस्करीविरोधात कारवाई केली आहे. दिवाळीच्या काळात मद्याची मागणी वाढत असल्याचा फायदा घेऊन काही तस्कर परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने तपासणी वाढवली होती. या मोहिमेअंतर्गत ठाणे विभागातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत परराज्यातील कर चुकवून आणलेले मद्य आणि इतर अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 85 लाख रुपये असल्याची माहिती आहे. 10 जणांना अटक, सात गुन्हे दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून संबंधित प्रकरणांमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध मद्याची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. दिवाळीच्या काळात स्वस्त दरात मद्य उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच अनधिकृत मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच मद्य खरेदी करावे आणि अनधिकृत ठिकाणांवरून मिळणाऱ्या स्वस्त मद्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. सणासुदीच्या काळात प्रशासन सतर्क दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ आणि मद्याची मागणी वाढत असल्याने दोन्ही विभागांनी तपासणी आणि कारवाई अधिक तीव्र केली आहे. एका बाजूला भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी FDAकडून मिठाई दुकाने, हॉटेल्स आणि उत्पादकांवर लक्ष ठेवले जात आहे. तर दुसरीकडे अवैध मद्याची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ आणि नियमांनुसार विक्री होणारे मद्य उपलब्ध व्हावे, यासाठी पुढील काळातही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि तस्करांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. हेही वाचा…. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत 32 आमदारांची उपस्थिती:पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, अर्थमंत्रीपदावरही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना सध्या वेग आला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद, अर्थमंत्रीपदाची मागणी आणि संघटनात्मक निर्णयांवरून राजकीय चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीला 32 आमदार उपस्थित होते. पक्षातील अंतर्गत प्रश्न, सत्तेतील कामांचा आढावा, शिवसेनेसोबतचे संबंध आणि आगामी राजकीय वाटचाल यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा… What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation MHT-CET घोटाळ्यावरून राजकीय संघर्ष:रोहित पवारांच्या ऑडिओ क्लिपवर भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचं स्पष्टीकरण