अमरावतीतील सुरेश भट स्मारक, गजल गुरुकुलला सरकारची अनुकूलता:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
![]()
कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने अमरावतीत स्मारक आणि जिल्ह्यात गजल गुरुकुल स्थापन करण्यासाठी सरकार अनुकूल असून त्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अमरावतीचे भूमीपुत्र गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्र्यांनी ही घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या स्थापना कार्यक्रमात हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी गजल लेखनाचे जनक कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या घोषणेनुसार, सुरेश भट यांच्या स्मारकासाठी गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या मदतीने जिल्हाधिकारी अमरावतीत जागा शोधतील. त्यानंतर त्या ठिकाणी हे स्मारक उभारले जाईल. याशिवाय, मराठी गजल हा ज्यांचा आत्मा आहे, त्या भीमराव पांचाळे यांनी गेल्या काही वर्षांपासून गजलसाठी गुरुकुल स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पालकमंत्र्यांनी या मनोदयालाही अनुकूलता दर्शवली असून, त्यासाठीचा खर्चही सरकार उचलणार असल्याचे स्पष्ट केले. अमरावतीला गजलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. कविवर्य सुरेश भट यांनी सुरू केलेला हा प्रवास आता भीमराव पांचाळे यांनी पुढे जपला आहे. या महान व्यक्तींच्या कार्याचा वारसा पुढे चालू राहावा, यासाठी सरकार हे पाऊल उचलत असल्याचे बावनकुळे यांनी अधोरेखित केले. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, केवलराम काळे, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवाणी, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे हेमंत काळमेघ, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत, सचिव सूरज दहाट, भीमरावजींच्या पत्नी गीता पांचाळे, मुलगी आणि गजल गायिका भाग्यश्री पांचाळे आदी मान्यवर उपस्थित होते. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या स्मारकासाठी कवि विष्णू सोळंके, वि. सा. संघाचे प्राचार्य रमेश अंधारे, डॉ. कुमार बोबडे आणि इतर स्थानिक साहित्यिकांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून मोर्चेबांधणी केली होती. या घोषणेमुळे त्यांच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. प्रशासनाने ठरविल्यानुसार, लवकरच स्मारकासाठीची जागा निश्चित केली जाईल आणि भूमीपूजनाच्या वेळी भीमराव पांचाळे यांचा नागरी सत्कार केला जाईल. सत्काराला उत्तर देताना भीमराव पांचाळे यांनी सांगितले की, अमरावतीमुळे त्यांचे जीवन सुकर झाले. नागरिकांचे प्रेम आणि गजलेने त्यांना मोठे केले आहे. सुरेश भटांना आदर्श मानून सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासाला पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
