महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेने उभारलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्यांक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून, काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. या शाळेची उभारणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून झाली असून, त्यांनी शाळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच व जर्मनसारख्या परकीय भाषा आत्मसात केल्या आहेत, हे बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे द्योतक असल्याचे फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले. पुणे जिल्हा परिषदेकडून ‘इंडस्ट्री ४.०’ अंतर्गत १०० शाळांमध्ये १०० अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील, असे फडणवीस यांनी घोषित केले. महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल तयार केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. मुंबई महानगरपालिकेची इमारत, खडकवासला धरण, येरवडा कारागृह आणि कात्रज बोगदा यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देत विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी करण्याचे कार्यही महात्मा फुले यांनीच केले, असे त्यांनी सांगितले. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही त्याच विचारांची फलश्रुती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे भुजबळ म्हणाले.
