धोका:नागरी वस्तीसह साचलेल्या कचरा ढिगाऱ्यांचा महावितरणाला फटका, महावितरणसोबतच परिसरातील नागरीकांनाही करावा लागते गैरसोय
![]()
अमरावती शहरात अलीकडे कचरा साचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्तीसह शहरातील मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवरही अनेकदा कचऱ्याचे मोठे ढिगारे दिसत आहेत. कचरा साचत असल्यामुळे नागरिकांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्याला आग लागून परिसरातील वीज यंत्रणेला नुकसान पोहोचण्याची भीतीही आहे. अलीकडेच शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्यामुळे महावितरणचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कचरा जाळू नका, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावर महावितरणच्या रोहित्राजवळ साचलेल्या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. ही आग अपघाती लागली की लावण्यात आली, याबाबत स्पष्टता नाही. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. महावितरण आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र या घटनेत महावितरणच्या वीज यंत्रणेला नुकसान झाले. परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळल्यामुळे वीज यंत्रणेला गंभीर धोका निर्माण होतो. यामुळे केवळ यंत्रणेचे नुकसान होत नाही. नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांनी सांगितले. शहरी आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज यंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. हा कचरा जळल्यास भूमिगत केबल्स तसेच इतर उपकरणांचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाढत्या उन्हामुळे अशा आगींचा धोका अधिक वाढला आहे. उपरी वीजवाहिन्यांखाली कचऱ्याला आग लागल्यास तारा वितळण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नागरिकांनी वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये. कचरा जाळू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान वीज यंत्रणेला आग लागल्याची घटना आढळल्यास तत्काळ ७८७५७६३८७३ या क्रमांकावर माहिती द्यावी. १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल-फ्री क्रमांकांवरही संपर्क साधावा. जवळच्या महावितरण कार्यालयालाही माहिती द्यावी, असेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वी कचऱ्यामुळे लागलेली आग अग्नीशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे आटोक्यात आली. मात्र आटोक्यात येईपर्यंत आगीमुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे नुकसान झाले होते. कचरा साचला नाही तर ही वेळच येणार नाही शहरात नागरी भाग असो किंवा बाजार परिसर, मुख्य रस्त्यालगत कचरा साचला नाही तर आग लागण्याचा धोका अगदी कमी होईल. मात्र शहरात सद्यस्थितीत सर्वच भागात कचऱ्याचे मोठे ढिगारे शहराचे सौंदर्य नासवत आहेत. त्या कचऱ्यांमुळे येणारी दुर्गंधी हा तर वेगळाच विषय आहे. घरातून कचरा संकलन नियमित नाही. शहरातील मुख्य मार्गालगत टाकलेला कचरा दररोज उचलला जात नाही. एकंदरीत सध्या शहरात कचरा संकलन व स्वच्छतेचे तीनतेरा झाले आहेत. त्यामुळे महावितरणने जनतेला वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचे आवाहन करावे. मनपा किंवा कचरा उचलणाऱ्या तत्सम यंत्रणेशी संपर्क करावा. शहरात, विशेषत: वीज यंत्रणेच्या आसपास, कचरा साचणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करणेही तेवढेच गरजेचे आहे.
