लाचखोर अभियंत्याच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू, शुक्रवारी आदेश निघणार:महावितरणच्या अधिकाऱ्यावर विभागीय चौकशीही होणार
![]()
सौर ऊर्जा कनेक्शनसाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या महावितरणचे सहायक अभियंता सुशांत हरिदास बावनगडे (वय ४५, रा. धारणी) यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील आदेश शुक्रवारी मुख्य अभियंत्याद्वारे जारी केले जातील. त्याचबरोबर त्यांची विभागीय चौकशीही सुरू केली जाईल. बावनगडे यांनी ‘सूर्यघर योजने’अंतर्गत सोलर पॅनल बसवलेल्या ग्राहकांना ‘सोलर मीटर रिलीज ऑर्डर’ देण्यासाठी लाच मागितली होती. तक्रारदाराने मार्च महिन्यात चार ग्राहकांच्या घरी सोलर पॅनल बसवले होते आणि त्यांना या ऑर्डरची आवश्यकता होती. तक्रारदार ७ एप्रिल रोजी महावितरण कार्यालयात या ऑर्डरबाबत विचारपूस करण्यासाठी गेले असता, बावनगडे यांनी प्रत्येक ग्राहकासाठी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण चार हजार रुपयांची लाच मागितली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने (एसीबी) पडताळणी केली. पडताळणीत बावनगडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, बुधवारी सापळा रचण्यात आला आणि रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धारणी येथील महावितरण कार्यालयाचे कामकाज पाहणारे अचलपूर येथील कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे मिळवून पुढील कारवाई सुरू केली आहे. लाचखोरीत सापडलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन ही एक सामान्य प्रक्रिया आहे. कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी सांगितले की, “लाचखोरीत सापडलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याचे निलंबन ही सहज प्रक्रिया असून ती वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत केली जाते. त्यानंतर सहा महिन्यांच्या आत केल्या जाणाऱ्या विभागीय चौकशीअंती त्या लाचखोर अभियंत्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.”
