पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणले:35 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला बेड्या

0
5ac0f19b-9971-4a50-accc-8a794e6e8009_1775743835966.jpg




पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड परिसरात झालेल्या तीन खुनांचा छडा लावत रेकॉर्डवरील तिघा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींपैकी एकावर ३५ गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. शिरोली, ता. आंबेगाव), नंदलाल दिलीप होले (वय ३१, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) आणि निलेश कैलास सणस (वय ३४, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) अशी आहेत. यातील पहिली घटना १८ मार्च रोजी खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जैदवाडी येथे घडली होती. धनंजय मारुती घेवडे (वय ३३, रा. राक्षेवाडी, ता. खेड; मूळ रा. कारेगाव, ता. आंबेगाव) यांचा डोक्यावर आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचे भाऊ सचिन मारुती घेवडे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पथक समांतरपणे करत होते. पोलिसांनी खेड ते वडगाव निंबाळकर या १४५ किलोमीटरच्या रस्त्यावरील ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यातून ललित खोल्लम आणि नंदलाल होले हे सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयित आरोपी वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर २५ मार्च रोजी सापळा रचण्यात आला. आरोपींनी आजूबाजूच्या उसाच्या शेताचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नदीच्या दिशेने धावले. मात्र, नदीपात्रात उडी मारण्यापूर्वीच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की, मयत धनंजय घेवडे आणि आरोपी होले हे एकाच गावात राहत होते. होले आणि निलेश सणस यांचे घेवडे यांच्याशी काही कारणावरून भांडण झाले होते. याच रागातून खोल्लम आणि होले यांनी लोखंडी रॉड आणि दगडाने मारून घेवडे यांचा खून केला. या गुन्ह्यासाठी निलेश सणस याने इतर आरोपींना पैसे पुरविल्याचेही तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी ललित खोल्लम याने श्रीकांत विलास वाडेकर (वय २६) आणि त्यांची आई रुपाली विलास वाडेकर (वय ४६, दोघेही रा. शिरोली, ता. खेड) यांचाही खून केल्याची कबुली दिली. यामुळे आणखी दोन खुनांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी खोल्लम आणि रुपाली वाडेकर यांचे प्रेमसंबंध होते. पैसे मागण्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. दरम्यान, रुपाली यांचा मुलगा श्रीकांत हाही आरोपी खोल्लमकडे पैशांची मागणी करत होता. याचा राग मनात धरून खोल्लमने श्रीकांतला खेड येथे बोलावून त्याचे अपहरण केले व त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. त्यानंतर आरोपी नंदलाल होलेच्या मदतीने श्रीकांतचा मृतदेह मंचर परिसरात जाळून टाकला आणि राख घोड नदीपात्रात टाकली.याप्रकरणी ठाणे शहरातील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच श्रीकांतची आई रुपाली वाडेकर या आरोपीला “माझा मुलगा कुठे आहे?” अशी वारंवार विचारणा करून भांडण करत होत्या. त्यामुळे आरोपी खोल्लमने रुपाली यांना शिरोली येथील सदनिकेत बोलावून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली व गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खोल्लम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी २ खुनांचे, १ खुनाच्या प्रयत्नाचे, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ३५ गुन्हे दाखल आहेत. तसेच नंदलाल होले याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपींवर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या दोघे जामिनावर बाहेर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed