संख्या पडताळणी अभियान:अमरावती जिल्ह्यात 4.83 लाख विद्यार्थी, बोगस संख्या लवकरच कळणार, तीन टप्प्यात पटपडताळणी
![]()
अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांची खरी संख्या पडताळण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. शनिवार, ११ एप्रिल रोजी या पटपडताळणीचा पहिला टप्पा सुरू होत असून, यामुळे शाळेच्या पटावरील खोट्या विद्यार्थी संख्येचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ही पटपडताळणी तीन टप्प्यांत केली जाईल. ११ एप्रिलनंतर उर्वरित शाळांची पडताळणी १५ आणि २२ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चारही माध्यमांच्या एकूण २ हजार ८७१ शाळा आहेत. या शाळांमध्ये ४ लाख ८३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, ६ हजारांहून अधिक शिक्षक त्यांना शिकवतात. पटपडताळणीसाठी एकूण शाळांना तीन गटांत विभागण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सुमारे ९५० शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवर (EO) यासाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) शिक्षक हे अधिकारी पटपडताळणी करतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे त्यांना या पटपडताळणीतून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेला जेवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तेवढीच त्यांची संख्या गृहीत धरली जाईल. विद्यार्थ्यांची मोजदाद पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. यासाठी शासनाच्या ‘स्टुडंट्स पोर्टल’चा वापर केला जाईल. संबंधित अधिकारी शाळेत पोहोचल्यावर पोर्टल उघडून विद्यार्थ्यांची नावे पाहतील आणि हजेरीपटानुसार उपस्थितीची नोंद करतील. या पटपडताळणीमुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक धास्तावले आहेत. पडताळणीच्या दिवशी एकही विद्यार्थी गैरहजर राहणार नाही, याची ते विशेष काळजी घेत आहेत. गैरहजेरी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष परीक्षांचे नियोजनही केले आहे, जेणेकरून विद्यार्थी उपस्थित राहतील.
