अमरावतीत पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला:परशुराम जयंतीनिमित्त 19 एप्रिलला कार्यक्रम, रक्तदान शिबिरे सुरू

0
b9492151-3fd2-486a-804c-5a4a986fc016_1775750533425.jpg




अमरावतीत पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रक्तदान शिबिरांची शृंखला सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे जमा झालेल्या रक्ताचा वापर तुला करण्यासाठी केला जाईल. या अनोख्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री माहेश्वरी पंचायत, श्री गोरक्षण संस्था आणि रामचरित मानस परिषद यांसारख्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ‘गौ माता सन्मान समिती’ ची स्थापना केली आहे. या समितीमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी माध्यमांना देण्यात आली. सहसंयोजक सुरेश साबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गोरक्षण संस्थेत होणार आहे. तत्पूर्वी, धनराज लेन येथील माहेश्वरी भवनातून भगवान श्री परशुराम आणि गौमातेची शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा सक्करसाथ, जवाहर गेट, प्रभात चौक, सरोज चौक, श्याम चौक, अंबादेवी रोडमार्गे गांधी चौक असा प्रवास करून गोरक्षण संस्थेत पोहोचेल. गोरक्षण संस्थेत परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज आणि राजराजेश्वर माऊली यांच्या उपस्थितीत गौमातेची रक्ततुला केली जाईल. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. अमरावतीत १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. आर. बी. अटल, संयोजक रमेश छांगाणी, प्रचारप्रमुख संजयकुमार राठी, रक्तदान समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, दीपक मंत्री आणि नवल चांडक आदी उपस्थित होते. यावेळी गौमातेच्या संवर्धनासाठी गौहत्याबंदी कायद्याची मागणीही करण्यात आली. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी २७ एप्रिल रोजी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पैदल मार्च काढण्यात येणार असून, सरकारला निवेदन दिले जाईल. या आंदोलनाचा समितीच्या कार्यक्रमाशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed