द इक्वाइन कलेक्टिव्हची पुण्यात राष्ट्रीय परिषद:11-12 एप्रिलला अश्व उद्योगाच्या भविष्यावर चर्चा होणार
![]()
भारतातील अश्व उद्योगाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी आणि त्याचे भविष्य घडवण्यासाठी ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’ने पुण्यात पहिल्या राष्ट्रीय ‘द इक्वेस्ट्रियन फोरम’ परिषदेचे आयोजन केले आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ही परिषद ११ व १२ एप्रिल रोजी पुण्यातील हॉटेल हयात येथे होणार आहे. या अश्वारोहण मंचाचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होईल. द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका व समन्वयक गायत्री राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एफ. एफ. वाडिया, पुण्याच्या जपलुप्पे इक्वेस्ट्रियनचे सह-संस्थापक रोहन मोरे आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या सीआयएपीचे सह-संचालक प्रा. रविशंकर साहू उपस्थित होते. या मंचाला पूनावाला स्टड फार्म्स, नानोली स्टड फार्म्स आणि नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया येथील डॉ. एफ. एफ. वाडिया यांचे सहकार्य लाभले आहे. या परिषदेत भारतातील अश्व उद्योग क्षेत्रातील शेकडो तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. हसनेन मिर्झा, याशन खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाईर, डॉ. रवी रेड्डी, बर्नार्ड डुव्हरनय, जुट्टा पुटझ आणि उत्पल एस. टाटू यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी होणाऱ्या पॅनल चर्चेमध्ये दोन मंत्री, कोलकात्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि अश्वारोहण खेळ व घोड्यांच्या शर्यतींवरील लेखक सायरस जे. मदन आणि ज्येष्ठ उद्योजक व पशुवैद्य डॉ. रवी रेड्डी यांसारख्या दिग्गजांची विविध सत्रे होतील. भारतीय अश्व परिस्थितीवरील धोरणात्मक दृष्टिकोन या विषयावर चर्चा होईल. हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉ. नितीन विरमानी रोग नियंत्रण आणि गतिशीलता या विषयावर बोलतील. केंटकी इक्वाइन रिसर्चचे डॉ. पीटर हंटिंग्टन ऑस्ट्रेलियाहून तरुण घोडे आणि कामगिरी करणाऱ्या घोड्यांसाठी आहार धोरणे या विषयावर मार्गदर्शन करतील. ऑस्ट्रेलियाचे मार्क बर्नेल मूल्य मानांकन या विषयावर आपले विचार मांडतील. ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष के. आर. गजेंद्र पाल सिंगजी पोसाना ‘देशी घोड्यांचा पुनर्वापर’ या विषयावर प्रकाश टाकतील. तंत्रज्ञान अवलंबन या संकल्पनेअंतर्गत जपालूप इक्वेस्ट्रियन सेंटर, पुणे येथील रोहन मोरे, द बार्न हाऊस, पुणे येथील रणजीत खेर आणि वायू टेक्नॉलॉजीज, पुणे येथील टीम यांची तीन सादरीकरणे होतील. चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिंधू, युनिव्हर्सिटी ऑफ सरे, यूके येथील श्री. ध्रुवपाल सिंग आंचन, वलसाड, गुजरात येथील यशस्वी ऑलिम्पियन अश्वारोहक श्री. इम्तियाज अनीस, यूके येथील अश्व प्रशिक्षक डॉ. डेव्हिड शीरीन, यूके येथील प्रतिष्ठित पशुवैद्य डॉ. डेसमंड लीडॉन हे पशुवैद्यकीय शिक्षण, घोडेस्वारांची तंदुरुस्ती आणि उद्योग क्षेत्राचे स्वरूप या विषयांवर बोलतील. जेपी ब्रँड्स, यूएसए येथील सुश्री जुट्टा पुट्झ या विस्तारक्षम अश्व व्यवसाय उभारण्यावर बोलतील. १२ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड कॅम्पसमध्ये दिवसाची सुरुवात घोड्यांच्या थेट प्रात्यक्षिकाने (उपयोजित शिक्षण / सादरीकरण) होईल. त्यानंतर फ्रान्सच्या सुश्री मॉड चॅटेल यांचे फिजिओथेरपीचे थेट प्रात्यक्षिक सत्र होईल. युकेचे बर्नार्ड डुव्हरने हे घोड्यांच्या नाल कामावर (फॅरिअरी) आणखी एक थेट प्रात्यक्षिक सादर करतील. तसेच, या वेळी खालील विषयांवर विशेष सादरीकरणे होतील. या मध्ये संकरण, संघर्ष, कल्याण मानके आणि नीतिमत्ता, अश्व धोरण, घोड्यांची आयात-निर्यात, आणि पशुवैद्यकीय व औद्योगिक दृष्टिकोन या विषयांवर गुजरातच्या वनतारा येथील डॉ. रामनाथन, युके येथील सुश्री झारा पॉली, युके येथील रोली ओवर्स, पुणे येथील स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. नमेश किल्लेमशेट्टी, पुणे येथील प्रसिद्ध भारतीय अश्वारोहण क्रीडापटू कपिलेश भाटे, नेतृत्व प्रशिक्षक, ब्लडस्टॉक विशेषज्ञ आणि लेखक गौरव रामपाल आणि बंगळूर येथील गॅलोपिन व्हेट क्लिनिकचे डॉ. हसनेन मिर्झा यांसारखे तज्ञ मार्गदर्शन करतील. रविवार, १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता परिषदेची सांगता होईल.
