ग्राहक बुचकळ्यात:सिलिंडर मिळण्याआधीच डिलिव्हरीचा संदेश; रांगा कायम, तासन् तास उभे राहूनही सिलिंडरसाठी करावी लागते प्रतीक्षा

0
f5155cc0-c2f5-40d9-b699-7802bcdc1c3b_1775750795728.jpg




अमरावतीमध्ये गेल्या महिनाभरापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सुरू झालेला हा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही सिलिंडरसाठी लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. भारत, इंडेन आणि एचपी या तिन्ही गॅस वितरकांच्या कार्यालयांबाहेर हेच चित्र दिसत आहे. अनेक ग्राहकांना सिलिंडर प्रत्यक्षात मिळण्यापूर्वीच ‘डिलिव्हरी झाली’ असा संदेश येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एजन्सी कर्मचाऱ्यांनुसार, बुकिंगनंतर साधारणतः १२ दिवसांत सिलिंडर मिळायला हवे, परंतु काही ग्राहकांना त्यापेक्षा जास्त काळ वाट पाहूनही सिलिंडर मिळालेले नाही. जेव्हा ग्राहक यासंदर्भात चौकशी करतात, तेव्हा एजन्सी कर्मचारी ‘तुमचा नोंदणीकृत फोन नंबर सांगा, सिस्टीमवर तपासू’ असे सांगतात. मात्र, त्याचवेळी आतून ‘सर्व्हर डाऊन’ असल्याचा संदेश दिला जातो. एचपीचे ग्राहक रवींद्र पाठक यांनी सांगितले की, त्यांना बुकिंगचा संदेश येऊन आठ दिवस झाले, तरी ‘आगामी आठ तासांत बुकिंगचा संदेश येईल, कृपया संयम बाळगा’ हा संदेश अद्यापही ‘आठ तास’ पूर्ण झाल्याचे दाखवत नाही. सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची होणारी ही धावपळ पाहता, प्रशासन ‘पुरेशा प्रमाणात सिलिंडर उपलब्ध आहेत’ असा जो दावा करत आहे, तो किती फोल आहे हे स्पष्ट होते. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात दररोज १५,७९४ सिलिंडरचा वापर होतो, ज्यात उज्ज्वला योजना आणि नियमित ग्राहक यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आयओसीचे २५, बीपीसीएलचे १७ आणि एचपीसीएलचे १४ असे एकूण ५६ गोदामे आहेत. या गोदामांमध्ये दररोज २४,५७४ सिलिंडर साठवले जातात. ही साठवण क्षमता रोजच्या वापराच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यकतेनुसार सिलिंडर ग्राहकांना पुरवले जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोर कायम असलेल्या रांगा प्रशासनाच्या या माहितीला खोडून काढत आहेत. दरम्यान, म्हाडा कॉलनी, अमरावती येथील संदीप मोरस्कर यांनी एका एजन्सीने केवायसीसाठी ३०० रुपये मागितल्याची तक्रार केली आहे. त्यांच्यासमोर एका महिलेकडून घरी जाण्यासाठी पैसे शिल्लक राहावेत म्हणून २०० रुपये घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed