येवदा-वडनेरला आरोग्य सुविधा द्या:खासदार अनिल बोंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना, विकासकामांचा घेतला आढावा
![]()
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दर्यापूर येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, येवदा आणि वडनेर गंगाई येथे अधिक आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. डॉ. बोंडे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि विविध यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरील सूचना केल्या. दर्यापूर तालुका शासनाच्या निर्देशांकानुसार अल्पसंख्याक संवर्गात येत असल्याने, या तालुक्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. येवदा आणि वडनेर गंगाई येथील रुग्णांच्या विविध तपासण्यांचे नमुने अमरावती येथे पाठवावे लागतात, ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. तपासणीची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध झाल्यास रुग्णांची अडचण दूर होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे डॉ. बोंडे यांनी नमूद केले. यावेळी डॉ. बोंडे यांनी विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली. यंत्रणांनी लोकाभिमुख कामे करताना आपले उत्तरदायित्व पाळावे आणि शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गरजूंना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी संबंधितांना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत असल्याने, नगरपालिकांनी पुढाकार घेऊन शहरातील अतिक्रमणे काढावीत. तसेच, ‘सर्वांसाठी घरे’ या शासनाच्या भूमिकेनुसार पट्टेवाटप करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४ प्रस्ताव पाठवण्यात यावेत. यावली शहीद येथील शहीद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी खात्री त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळवून घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत केंद्र सरकारच्या ‘नमो उद्यान’ आणि ‘वड उद्यान’ या विषयांवर अधिक चर्चा झाली. वन विभागामार्फत जिल्ह्यात ही उद्याने तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण करावीत आणि ती तयार करताना झाडांची संख्या अधिक असावी, असेही डॉ. बोंडे यांनी निक्षूण सांगितले.
