दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:प्रशांत महासागरातील न्यूट्रल प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस कमी
![]()
जागतिक हवामान बदलाचे पडसाद आता थेट भारताच्या मान्सूनवर उमटण्याची चिन्हे आहेत. प्रशांत महासागरातील न्यूट्रल (तटस्थ) स्थिती आगामी काळात अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम भारताच्या पावसाळ्यावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या नॅशनल एन्व्हायर्नमेंटल प्रेडिक्शन सेंटर आणि नोव्हा क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर यांसारख्या जागतिक संस्थांच्या रिअल-टाइम मॉनिटरिंगनुसार, प्रशांत महासागरातील तापमानाचा वेग चिंताजनक आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य वाटला तरी पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र चिंतेचे सावट राहण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा : तडाखा कमी, पण उकाडा जास्त : हवामानतज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला यंदाचा उन्हाळा तुलनेने सुसह्य असेल. जुलैपर्यंत प्रशांत महासागरातील स्थिती तटस्थ राहणार असल्याने तापमानात मोठी वाढ अपेक्षित नाही. महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहील. मात्र, किमान तापमानात किंचित वाढ झाल्यामुळे कडक उन्हापेक्षा हवेतील उकाडा अधिक जाणवेल. ७ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. पावसाळ्याचे दोन भिन्न टप्पे: सुरुवातीला दमदार, नंतर घट पहिला टप्पा (जून-जुलै): या काळात परिस्थिती तटस्थ असल्याने पावसाची सुरुवात समाधानकारक आणि दमदार असेल. पहिल्या दोन महिन्यांतच पावसाची सरासरी गाठली जाईल. एल निनो : तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियसने वाढल्यास एल निनो सक्रिय होतो. तटस्थ स्थिती एल निनोकडे झुकल्याने, ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान तीव्रता अधिक असेल. जागतिक हवामानाचा कणा मानल्या जाणाऱ्या प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील निनो ३.४ सेक्शनमधील तापमानावर सर्व गणित अवलंबून असते. अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता सध्याची तटस्थ स्थिती महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पावसासाठी पोषक आहे. याच काळात इंडियन ओशन इंडेक्स (भारतीय सामुद्रिक स्थिरांक) सकारात्मक स्थितीकडे सरकत असल्याने अरबी समुद्राकडून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल. मात्र, मान्सूनपूर्व काळात अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र. न्यूट्रल स्थिती : जेव्हा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील तापमान सरासरी इतके असते, तेव्हा त्याला न्यूट्रल स्थिती म्हणतात. ला निना : तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियसने घटल्यास ला निना सक्रिय होतो, जो भारतासाठी पावसाळ्यात कायम चांगल्या पावसाचे लक्षण मानला जातो. दुसरा टप्पा (ऑगस्ट-सप्टेंबर): जुलैअखेर परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल. निनो ३.४ ची तीव्रता वाढून अल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटेल. परिणामी, पावसाळा केवळ सरासरी गाठेल, परंतु सरासरीपेक्षा अधिक पावसाची अपेक्षा यंदा फोल ठरू शकते.
