HDFC Bank MCLR | HDFC बँकेने स्वस्त केलं कर्ज! लोनचा हप्ता कमी होणार?
HDFC Bank MCLR | देशातील आघाडीची खाजगी बँक HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँकेकडून कर्ज घेतलेल्या काही ग्राहकांच्या ईएमआयमध्ये थोडी घट होण्याची शक्यता आहे.
बँकेने MCLR मध्ये 5 बेसिस पॉइंटपर्यंत कपात केली असून हे नवीन दर 7 एप्रिल 2026 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर बँकेचा MCLR आता 8.10 टक्क्यांपासून 8.55 टक्क्यांदरम्यान आला आहे. यापूर्वी हा दर 8.15 टक्क्यांपासून 8.55 टक्क्यांपर्यंत होता.
बँकेने मुख्यतः कमी कालावधीच्या कर्जासाठी असलेल्या MCLR मध्ये कपात केली आहे. ओव्हरनाइट आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 8.15 टक्क्यांवरून कमी करून 8.10 टक्के करण्यात आला आहे. तसेच तीन महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR 8.25 टक्क्यांवरून कमी करून 8.20 टक्के करण्यात आला आहे.
मात्र सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठीच्या MCLR दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे दर अनुक्रमे 8.35 टक्के, 8.35 टक्के, 8.45 टक्के आणि 8.55 टक्के इतकेच कायम ठेवण्यात आले आहेत.
HDFC Bank MCLR | EMI वर कसा होणार परिणाम? :
ज्या ग्राहकांचे फ्लोटिंग रेट कर्ज ओव्हरनाइट, एक महिना किंवा तीन महिन्यांच्या MCLR शी जोडलेले आहे, त्यांना या निर्णयाचा थेट फायदा होऊ शकतो. त्यांच्या ईएमआयमध्ये किरकोळ घट दिसू शकते. विशेषतः पर्सनल लोन आणि अल्पकालीन व्यवसाय कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, MCLR म्हणजे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीचा किमान व्याजदर असतो. 2016 मध्ये हा बेंचमार्क लागू करण्यात आला होता, ज्यामुळे कर्जाच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राखली जाते. होम लोन, पर्सनल लोन आणि बिझनेस लोन यांसारखी अनेक कर्जे या बेंचमार्कशी जोडलेली असतात, त्यामुळे त्यातील बदलाचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडतो.
