'संयुग 7' कर्करोगावर प्रभावी; पेशींची वाढ रोखते:बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे संशोधन आशादायी, डॉ. श्रीकांत माने यांची माहिती
![]()
कर्करोगावर अधिक परिणामकारक आणि कमी दुष्परिणाम असलेले उपचार विकसित करण्याच्या दिशेने बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ‘संयुग ७’ या नव्या फायटो-औषध आधारित संयुगाने कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात आशादायक परिणाम दर्शवले आहेत. जनुकशास्त्र आणि अचूक उपचारपद्धती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ, येल विद्यापीठाचे (अमेरिका) प्राध्यापक डॉ. श्रीकांत माने यांनी या संयुगाच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली. डॉ. माने पुण्यातील यशदा येथे आयोजित कर्करोग विषयक विशेष शास्त्रीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, बीव्हीजी लाइफ सायन्सेसच्या संचालिका डॉ. जयश्री द्रविड यांच्यासह प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विनय थोरात, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे विभागप्रमुख उपस्थित होते. साताऱ्याहून डॉ. प्रतापराव गोळे हे खास या कार्यक्रमासाठी आले होते. एकूण २५० डॉक्टरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. डॉ. माने यांनी सांगितले की, ‘संयुग ७’ कर्करोग पेशींची वाढ थांबवते, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि त्यांचा शरीरातील इतर भागांमध्ये प्रसार (मेटास्टेसिस) होण्यास प्रतिबंध करते. तसेच, हे संयुग शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देत कर्करोगविरोधी लढा अधिक प्रभावी बनवते. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे संयुग कर्करोग पेशींवर प्रभावीपणे परिणाम करते, तर सामान्य पेशींवर त्याचा अत्यल्प किंवा नगण्य परिणाम आढळतो. या संशोधनातून ‘संयुग ७’ कर्करोगाच्या वाढीशी संबंधित विविध जैविक प्रक्रियांवर प्रभाव टाकत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षित, लक्ष्यित आणि अधिक प्रभावी उपचार विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, असे डॉ. माने यांनी नमूद केले. बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, बीव्हीजी लाइफ सायन्सेस गेल्या दशकभरापासून फायटो-औषध संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कर्करोगासह इतर अनेक आजारांवर प्रभावी औषधे विकसित करण्यात यश मिळाले आहे. या संशोधनामुळे देशातील कर्करोग रुग्णांना नवी आशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
