गॅस पाइपलाइन विस्ताराला गती द्या:पुण्याच्या महापौर नागपुरेंचे निर्देश, सर्व भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी आढावा बैठक पडली पार
![]()
पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडून होणाऱ्या गॅस पुरवठ्याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरात गॅस पाइपलाइन विस्ताराला गती देण्याचे आणि सर्व भागांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचे निर्देश दिले. महापौरांनी विशेषतः ज्या भागांमध्ये अद्याप गॅस सेवा पोहोचलेली नाही, त्या भागांना प्राधान्याने जोडण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले की, “शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, अखंड आणि सुलभ गॅसपुरवठा मिळावा, ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे.” एमएनजीएल संदर्भात ही महत्त्वाची आढावा बैठक मंगळवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील सुरू असलेल्या गॅस पाइपलाइन कामांसह प्रस्तावित प्रकल्पांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस एमएनजीएलचे वरिष्ठ अधिकारी, तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी एमएनजीएलकडून शहरातील विविध भागांतील कामांची सद्य:स्थिती, गॅस पाइपलाइनचे कव्हरेज आणि भविष्यातील विस्तार आराखडा याची माहिती सादर करण्यात आली. महापौर नागपुरे यांनी एमएनजीएल आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय साधून पुढील कामे गतीने राबवली जातील असे सांगितले. पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक व नागरी समस्यांवर पूर्वतयारी पुणे, बाणेर–पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण व परिसर वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आज औंध क्षेत्रीय कार्यालय येथे संयुक्त समन्वय बैठक पार पडली. या बैठकीस औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी जतिन कोटे, माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिक, तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात उद्भवलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे, पादचारी सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आदी मुद्दयावर ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली, यात प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
