नव्या सीईओंकडून दोन दिवसांत 20 विभागांचा आढावा:सत्यम गांधी यांचे गुणवत्ता, वेळेत सेवा, तंत्रज्ञानावर भर देण्याचे निर्देश

0
1a1a2835-59be-417c-9d0d-56932ba03218_1775664092598.jpg




अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तब्बल २० विभागांचा आढावा घेतला. कामात गुणवत्ता कायम ठेवा, नागरिकांना वेळेत सेवा द्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यांच्या या मॅरेथॉन कामकाजामुळे जिल्हा परिषदेत सक्रियता दिसून येत आहे. गांधी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यालयातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी त्यांनी एकेक करून सर्व २० विभागांचा आढावा घेतला. कामांची निर्धारित वेळेत पूर्तता होते आहे की नाही, जनतेला अपेक्षित सेवा मिळते आहे की नाही आणि बांधकाम व पाणीपुरवठा विभागांची कामे गुणवत्तापूर्ण आहेत की नाही, याची त्यांनी यावेळी चाचपणी केली. मंगळवारी दिवसभर सीईओंनी ११ विभागांचा आढावा घेतला. सकाळी १० वाजता सामान्य प्रशासन विभागाच्या बैठकीने आढाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक तासाला एक याप्रमाणे ग्रामपंचायत, वित्त, पाणीपुरवठा व स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए), ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाचा आढावा उशिरा सायंकाळपर्यंत सुरू होता. बुधवारी दुसऱ्या दिवशी सीईओंनी जलसंधारण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उर्वरित आढावा घेतला. दुपारी १२ वाजता वाहन निर्लेखन विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर काही बैठका अर्ध्या तासाच्या तर काही तासाभराच्या कालावधीत पार पडल्या. बांधकाम विभागाची बैठक सुमारे तासभर चालली. याव्यतिरिक्त लघुसिंचन, समाज कल्याण व दिव्यांग कल्याण, मनरेगा, ग्रामविकास व पंचायत राज, माध्यमिक व योजनांसाठी काम करणारा शिक्षण विभाग, एचव्हीपी लसीकरण मोहीम आणि कृषी विभागाचा उर्वरित आढावा घेण्यात आला. या सर्व बैठकांची सूचना सीईओंनी पदभार घेतल्याच्या पहिल्याच दिवशी सर्व विभागप्रमुखांना दिली होती. त्यामुळे प्रत्येक विभागप्रमुख आपली टिपणी व सहकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित होते. सीईओंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये त्यांच्याकडून त्या-त्या विभागाचे कामकाज जाणून घेतले. या आढावा बैठकांद्वारे सीईओ सत्यम गांधी यांनी केवळ विभागांचे कामकाज कसे चालले आहे, हेच जाणून घेतले नाही, तर प्रत्येक विभागप्रमुखाचा आवाका, त्यांचे अधिनस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद तसेच संबंधित विभागप्रमुखाची प्रशासनावर किती पकड आहे, या मुद्द्यांचीही त्यांनी चाचपणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed