'ते पन्नास दिवस' कादंबरी रद्द; AISF ची स्थगितीची मागणी:ऐन परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम बदलामुळे विद्यार्थी संभ्रमात, प्र-कुलगुरुंना निवेदन
![]()
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कला शाखेतील बीए भाग दोनच्या अभ्यासक्रमातून ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन कादंबरी पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयएसएफ) केली आहे. या मागणीच्या पुष्ट्यर्थ एआयएसएफच्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. ढोरे यांना एक निवेदन सादर केले, ज्यात ‘ते पन्नास दिवस’ कादंबरी पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. पवन भगत यांनी लिहिलेली ही कादंबरी बीए भाग २ च्या चौथ्या सेमिस्टरच्या मराठी साहित्य मेजर-एक या विषयात समाविष्ट होती. या कादंबरीमध्ये कोरोना काळात सामान्य नागरिक आणि विशेषतः मजुरांची झालेली फरफट मांडण्यात आली आहे. एआयएसएफच्या मते, ही कादंबरी समाजाचे त्यावेळचे वास्तव चित्रण वाचकांसमोर उभे करते. त्यातून सामाजिक असमतोल, राज्यकर्त्यांची भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट होते, ज्यामुळे विद्यार्थी अधिक परिपक्व व चिंतनशील बनतात. त्यामुळे ती रद्द करू नये, असे एआयएसएफने प्र-कुलगुरुंना सांगितले. काही व्यक्ती आणि संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ४ एप्रिल रोजी अधिसूचना क्रमांक ५२/२०२६ नुसार सदर कादंबरी अभ्यासक्रमातून वगळली. त्याऐवजी ‘धग’ ही दुसरी कादंबरी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. एआयएसएफने निदर्शनास आणले की, परीक्षा जवळ आली असताना इतक्या कमी कालावधीत नव्या कादंबरीचे अध्यापन विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयात होणे शक्य नाही. यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांनी एआयएसएफने दिलेले निवेदन विद्या परिषदेकडे पाठविण्यात येईल, असे यावेळी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार अध्यापनाचे दिवस ३ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होऊन १८ एप्रिलला संपणार आहेत, तर मे महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे ऐन परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम बदलण्याच्या या निर्णयाबद्दल विद्वतजन आणि विद्यार्थीही बुचकळ्यात पडले आहेत.
