गॅस तुटवडा; वंचितने रस्त्यावर मांडली चूल:जिल्हाधिकारी कार्यालयासह सात तालुक्यांच्या ठिकाणी एकाच वेळी पुकारला एल्गार
![]()
गॅस सिलिंडर तुटवठ्यावरुन वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रात घेत सोमवारी “चूल मांडो’ आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी एकाच वेळी एल्गार पुकारत सरकारवर टीकास्त्र डागले. रस्त्यावर तयार केलेली भाकरी, मिरचीचा ठेचा असलेले ताट हातात घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हे ताट अधिकाऱ्यांना दिले. सिलिंडर नसल्याने चुलीवर तयार असलेला भाकर-ठेचा गोड मानून घ्या, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. िसलिंडरचा तुटवडा नसल्याचा प्रशासनाकडून दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी असून, याच मुद्द्यावर वंचितने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात जिल्हा प्रमुख प्रमोद देंडवे, ज्ञानेश्वर सुलताने, मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, राजेंद्र पातोडे, गजानन गवई, नगरसेवक पराग गवई, शेख मकर, शोभा शेळके, चंद्रशेखर चिंचोळकर, संगीता अढाऊ, राजकुमार दामोदर, प्रा. मंतोष मोहोड, नितीन सपकाळ, बुद्धभूषण इंगोले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितने मंडप थाटले. यात रिकामे सिलिंडर ठेवण्यात आले. सर्वात पुढे दोन मातीच्या चुली तयार करण्यात आल्या. चुलीची पूजा करून “चूल मांडो’ आंदोलन सुरू झाले. ज्वारीची भाकर, ठेचा तेथेच तयार करण्यात आला. ‘नरेंदर कब मिलेगा गॅस सिलिंडर’, ‘देवेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर’, अशा घोषणा देत आंदोलकांनी हातात फलकही धरले. काही वेळ रस्त्यावरच तयार केलेली भाकरी-ठेचा खात आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटला मंडप; सरकारविरोधात दिल्या घोषणा सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती लोकसभा, विधानसभेसह अन्य निवडणुकांमध्ये वंचितने निवडणूक चिन्ह गॅस सिलिंडर होते. हाच धागा धरत चूल मांडो आंदोलनात ‘जर निवडणुकीत गॅस सिलिंडर निवडला असता तर आज किचनमध्ये गॅस सिलिंडर असता’, असे फलक वंचितच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील पाचपैकी एकाही मतदारसंघात विजय झाला नाही. आता गॅसच्या मुद्द्यावरुन वंचितने सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी गॅस एजन्सीबाहेर एका वृद्धाच्या झालेल्या मृत्युवरुनही वंचितने आक्रमक भूमिका घेतली होती. आता अन्य विरोधी पक्ष सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या गॅसच्या प्रश्नावर मूळ गिळून बसले असतानाच वंचितने मात्र रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांमध्ये जोरदार राजकीय कुरघोडी होणार आहे.
