सोनटक्के प्लॉटमध्ये अतिक्रमण वादावरून दोन गटांत सशस्त्र राडा:सहा जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर, सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू, जुने शहर पाेलिसात गुन्हा
![]()
जुने शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात अतिक्रमणाच्या वादावरून एकाच समुदायातील दोन गटांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. या घटनेला हिंसक वळण लागले. दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. शिवीगाळही झाली. त्यानंतर परिस्थिती चिघळली. दोन्ही गट आमने-सामने
.
अतिक्रमणाच्या वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनटक्के प्लॉट येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद काही वेळातच उग्र झाला. दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांना शिवीगाळ केली. हाणामारी सुरू झाली. यावेळी काही जणांनी तलवार, लोखंडी पाइप तसेच कोयत्याचा वापर करून हल्ला केल्याचे गंभीर जखमी रुग्णाचा मुलगा शेख इब्राहिम शेख जमील कुरेशी याने सांगितले. सहा ते सात लोकांनी आपल्या वडिलांवर तलवारीने हल्ला केला. यावेळी घरातील महिलाही जखमी झाल्याचे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले.
जखमींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात मोठा जमाव जमला होता. नियंत्रणासाठी मोठी पोलिस कुमक बोलावण्यात आली होती. जखमींची नावे समजू शकली नाहीत.
घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री बारापर्यंत सुरू होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांचा धाक संपला ? दरम्यान, गेल्या आठवड्यापासून शहरात खून, हाणामाऱ्याच्या घटना वाढल्याने पोलिसांवरील ताणही वाढला आहे. शहरात किरकोळ कारणांवरून सशस्त्र हाणामाऱ्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये कायद्याचा धाक संपला का, अशा चर्चा रंगत आहेत. कारण अल्पवयीन मुलांच्या टोळ्या शहरात मुजोरी करत आहेत. एकुणच गेल्या महिनाभरात जिल्ह्याचा क्राइम रेटही वाढता आहे. पोलिस अधीक्षकांनी ही गंुडागर्दी मोडून काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी सुज्ञ अकोलेकरांची अपेक्षा आहे.
