कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल:पार्थ पवारांचे टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; संजय राऊतांवरही साधला निशाणा
![]()
कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल. त्यामुळे मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते पार्थ पवार यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती. यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ते राजकारणात अजून लहान आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचे नाही, असेही पटोले यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, संजय राऊत यांना त्यांच्याच पक्षात कोणी मान्यता देत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना मान्यता द्यावी असे वाटत असेल तर त्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्र गुजरातचे लोक चालवतात पुढे बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, धर्मामध्ये आणि भाषेत भाजपने जे वाद निर्माण करून ठेवले आहेत. या मुंबईत देशाच्या आर्थिक राजधानीत गुजराती मराठी वाद निर्माण होणे यामागे भाजप आहे. राज्याला खऱ्या अर्थाने आपले राज्यातले मुख्यमंत्री नाही चालवत. गुजरातचे लोक चालवतात. कॉंग्रेसच्या काळात असा कुठलाही वाद कधीही झाले नाही. भाजपने पेरलेले हे विष आहे. ते आज भाषा या वादावर आणि मुंबईत ते पेटत आहे. अशोक खरात एक टार्गेट, यात मोठी राजकीय खेळी अशोक खरात प्रकरणी ईडीचा गुन्हा दाखल झाला आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, कालच मी सांगितले की ईडीची कारवाई सुरू झाली. कारण यात आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी तसेच राजकीय लोक यांचे पैसे विदेशात पाठवण्याचे काम खरातच्या माध्यमातून होत होते हे समोर आले आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही स्वाभाविक आहे. अशोक खरात हा एक टार्गेट आहे. यात राजकीय खेळी आहे, असेही पटोले म्हणाले. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, अशोक खरातची पत्नी सापडत नाही, महाराष्ट्राची पोलिस इतकी कमकुवत आहे का? गृहमंत्रालय याला कारणीभूत आहे का? अशोक खरात हे प्रकरण साधे नाही. यात अनेक गोष्टी पुढच्या काळात समोर येणार आहेत. कंत्राटदारांचे 89 हजार कोटींचे देणे बाकी कंत्राटदारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि बजेट अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडला होता. सरकारने यावर उत्तर देताना सांगितले होते की आता त्यांचे काही थकीत राहिलेले नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार खोटे बोलताना आपण बघितले आहे. जवळपास 89 हजार कोटींचे देणे या कंत्राटदारांचे बाकी आहे. यासाठी आता कंत्राटदारांनाच आंदोलन करावे लागत आहे आणि एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नुसत्या घोषणा करून मोदीने पैसे देणे बंद केले, अशी टीकाही पटोले यांनी केली आहे.
