भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला न्यायालयीन कोठडी:प्रसादातील गुंगीकारक औषधाची माहिती देण्यास आरोपीचा नकार
![]()
भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दैवी अवतार असल्याची बतावणी करणाऱ्या वैद्यवर एका महिलेला प्रसादातून गुंगीकारक औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. प्रसादात नेमके कोणते औषध मिसळले आणि ते कोठून खरेदी केले, याबाबत आरोपी माहिती देत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला आहे. ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय 39, रा. वसई, पालघर) याच्याविरोधात बलात्कार आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, एका 35 वर्षीय महिलेने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मांजरी पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आरोपी वैद्यच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला वानवडी येथील लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीची लैंगिक सक्षमतेची चाचणी करण्यात आली आहे. तसेच, आरोपी पीडितेला मांजरी आणि वसई येथील ज्या लॉजमध्ये घेऊन गेला होता, तेथेही तपास करण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी जप्त करणे, पीडितेची आक्षेपार्ह छायाचित्रे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये आहेत का, याचा तपास करणे आणि आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत चौकशी करणे बाकी आहे. यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. साजिद शाह, ॲड. दिगंबर देसाई आणि ॲड. पवन कुलकर्णी यांनी पोलिस कोठडी वाढवण्यास विरोध केला. सरकारी पक्षाने जुनीच कारणे दिली असून, आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वैद्यच्या पोलिस कोठडीत चौकशीचा अधिकार अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी वैद्य धर्मगुरू असल्याने त्यांच्या डोक्यावरील शिखा (शेंडी) हा धार्मिक प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला वैद्य यांची शेंडी न कापण्याचे आदेश द्यावेत, असा अर्ज वैद्यच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून आरोपीची शेंडी न कापण्याचे आदेश दिले, अशी माहिती ॲड. साजिद शाह यांनी दिली.
