शहरात रंगणार श्री श्याम संकीर्तन महोत्सव; भजनकारांची मांदियाळी:गोरक्षण रोडचा राजा- विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाचा पुढाकार
![]()
सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या युवकांच्या गोरक्षण रोडचा राजा- विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने द्वितीय श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय भजनकार सहभागी होणार असून शहरात भक्तीभाव निर्माण होणार आहे. रामदेवबाबा- श्यामबाबा मंदिरात मंडळाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाबाबतची माहिती देण्यात आली. शुक्रवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मूर्तिजापूर रोडवरील सिटी स्पोर्ट क्लबच्या प्रांगणात हा द्वितीय श्री श्याम संकीर्तन महोत्सव होणार आहे. मंडळाच्या वतीने गतवर्षी अशाच प्रकारचा प्रथम श्याम संकीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्रीय भजनकार राज पारीक उपस्थित होऊन त्यांनी संगीतमय भजने सादर केली होती. यंदाही भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाच्या समाप्तीनंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. श्री श्याम संकीर्तन महोत्सवाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत मंडळाचे मार्गदर्शक सुधीर रांदड, संजय शर्मा, मुरलीधर उपाध्याय, अॅड. सौरभ शर्मा, राजू शर्मा बालाजी, प्रथमेश शर्मा, मधूर बिसेन, सिमरनजीतसिंह बछेर, श्रीकांत इंदोरीया, मुकेश शर्मा, अनमोल बछेर, सुनील कोरडीया आदी उपस्थित होते. श्यामबाबांचा दरबार: श्रीश्याम संकीर्तन भजन महोत्सवाचे आकर्षक व भक्तिमय श्री श्यामबाबांचा दरबार निर्माण करण्यात येणार असून यामध्ये फुलांची व सुवासिक अत्तरांची वर्षा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या प्रारंभ प्रसंगी भव्य आतिषबाजी करून मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. श्रीश्याम संकीर्तन भजन महोत्सवात स्थानिक भजनकार गोपाल शर्मा हारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी निर्माण केलेल्या “गोरक्षण का राजा”-या गीताच्या चित्रफितीचा अनावरण सोहळा होणार आहे. श्रीश्याम संकीर्तन या राष्ट्रीय संकीर्तन महोत्सवात राष्ट्भरातील खाटू नरेश श्याम भक्तात प्रसिद्ध असणारे “तीन बाण के धार’ या भजनाने राजस्थान येथील प्रसिद्ध भजनकार छोटूसिंग रावणा हे प्रथमच शहरात येत असून श्याम भजनांची वर्षा भक्तांवर करणार आहेत. त्यांच्या समवेत राजस्थान येथील श्यामबाबाचे पावन खाटू धाम येथील सेवक परिवार आलूसिंह व मोहनदास यांचे वंशज सेवाधारी भजनकार महाराज शामसिंह चौहान यांची उपस्थिती व इंदूर येथील बासरी वादक देव कनेरी यांची साथसंगत लाभणार आहे.
