बारामतीत नवा ट्विस्ट:सुनेत्रा पवारांच्या कॉलनंतर काँग्रेसची पावलं मागे? हर्षवर्धन सपकाळांचा दौरा अचानक रद्द; रणनीती बदलली का?
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात अचानक घडलेल्या बदलांमुळे चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केलेल्या फोन कॉलनंतर राजकीय समीकरणं बदलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांचा बारामती दौरा अचानक रद्द झाल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच बारामती पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. रविवारी पक्षाकडून आकाश मोरे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज भरताना हर्षवर्धन सपकाळ स्वतः उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्ज भरण्याच्या दिवशीच त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली. अधिकृत कारण म्हणून केरळमधील निवडणूक प्रचाराचे कारण सांगितले जात असले तरी, या निर्णयामागे सुनेत्रा पवार यांच्या फोन कॉलचा प्रभाव आहे का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, आकाश मोरे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या सोबत स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सपकाळ यांच्या अनुपस्थितीत हा अर्ज भरण्याचा कार्यक्रम पार पडणार असल्याने काँग्रेसच्या भूमिकेबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. बारामतीत काँग्रेस खरोखर पूर्ण ताकदीने लढणार की काही बदल घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माघार दुसरीकडे, या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवारीची घोषणा करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. ते सोमवारी बारामतीत दाखल झाले असले तरी, त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे यांनी हाके यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ माघार घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. एकंदर पाहता, बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शेवटच्या क्षणी मोठे राजकीय बदल घडताना दिसत आहेत. एका फोन कॉलपासून सुरू झालेल्या चर्चांनी आता काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पुढील काही तासांत उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेनंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होणार असली तरी, सध्याच्या घडामोडींमुळे बारामतीतील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
