उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्यसंस्काराला या:'तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे', असे म्हणत विवाहितेची आत्महत्या
![]()
‘मी तुमच्या आवडीची साडी साडी घालून नवरी बनून तयार आहे. उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्यसंस्काराला या, अशा काळजाला हात घालणाऱ्या शब्दांत एका सासुरवाशिणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. पतीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्य आलेल्या या विवाहितीने आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या नवऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महादुला परिसरात ही घटना घडली. मयुरी मेंढे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे संदीप मेंढे नामक तरुणाशी लग्न झाले होते. पण पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे गत काही दिवसांपासून ती आपल्या माहेरी महादुला परतली होती. ती मोठ्या मानसिक तणावात होती. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या पतीशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण पतीने फोन उचलला नाही. अखेर ती हताश झाली आणि त्याच नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. घरातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले असता तिने संधी साधून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी आढळली सुसाईड नोट रात्री कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना मयुरी गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आली. तिला तत्काळ लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तिने आपल्या पतीवर प्रेम व्यक्त करत आपल्या मनातील दुःख व मानसिक त्रास कथन केला आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त् केली आहे. मयुरीने काय म्हटले आहे आपल्या शेवटच्या चिठ्ठीत? मयुरी मेंढे आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हणते, मी तुमच्यावर खूप प्रेम करते संदीप. पण तुम्ही मला समजून घेत नाही. दीड महिन्यापासून मी तुम्हाला रोज समजावत होते. मला रोज एक आशा होती की, तुम्ही मला समजून घ्याल. पण तुम्ही समजायला तयारच नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आता मी तुम्हाला समजावून थकले म्हणून तुमच्यापासून खूप दूर जात आहे. याला जिम्मेदार तुम्ही आहात संदीप. तुम्हाला वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सुट्टी घ्यायीच गरज पडणार नाही. उद्या रविवार आहे. माझ्या अंत्ययात्रेला या. तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे, तुम्ही दिलेली साडी घालून. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा तशीच तयार झाली आहे. या वेळ काढून. तुम्ही मला मजबूर केले म्हणून मी तुमच्यामुळे आत्महत्या करत आहे, असे या चिठ्ठीत नमूद आहे. दरम्यान, मयुरी मेंढेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केलेत. नवऱ्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळेच मयुरीने हे पाऊल उचलले असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मयुरीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
