पुण्यात भाजपचे संघटन ५१% वर नेण्याचे उद्दिष्ट:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार; पक्षाशी तरुणांना जोडण्याचा संकल्प
![]()
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी काळात भाजप पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात भाजपचे संघटन ५१ टक्क्यांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटनेच्या बळकटीवर भर देत, राज्यभरातही संघटना वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्षाचा विस्तार करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणावर जोडण्याचा संकल्पही त्यांनी मांडला. बावनकुळे हे भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त पुणे शहरातील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले. ते लवकरच बारामतीला जाणार असून, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज स्वतः भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीत ७५ टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवण्याचा दावाही त्यांनी केला. बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला बारामतीमध्ये निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले. अजित पवार यांचा दीर्घ राजकीय प्रवास काँग्रेससोबत राहिला आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय योगदानाचा विचार करून काँग्रेसने सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. अशोक खरात प्रकरणावर बोलताना, हा विषय संवेदनशील असून विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
