पुणे कॅम्प परिसरात बाबासाहेबांचे बॅनर उलटे लावले:मिटकरींनी पोस्ट केला व्हिडिओ; म्हणाले – महापुरुष एवढे स्वस्त झालेत? विटंबना थांबवा
![]()
पुणे कॅम्प परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर उलटे लावण्यात आल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी या बॅनरचा एक फोटो व व्हिडिओ पोस्ट करत त्यावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. आपले महापुरुष एवढे स्वस्थ झालेत का? ही विटंबना तत्काळ थांबवा, असे ते म्हणालेत. येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या गावोगावी सुरू आहे. या निमित्त शहरांतही रस्त्याच्या दुतर्फा अभिवादनाचे बॅनर्स लावण्यात आलेत. पण हे बॅनर लावताना काही अक्षम्य चुकाही होत आहेत. असाच प्रकार पुण्याच्या कॅम्प परिसरात घडला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या डिव्हाडरवरील पोलला बाबासाहेबांचे बॅनर लावण्यात आलेत. पण एक बॅनर उलटे लावण्यात आले आहे. या बॅनरवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. हा प्रकार चुकीने झाला की मुद्दाम हे सांगता येणार नाही. पण राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. काय म्हणाले अमोल मिटकरी? अमोल मिटकरी यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चक्क उलटे बॅनर लावण्यात आल्याची बाब निदर्शनास येत आहे. मिटकरी ही बाब निदर्शनास आणून देताना म्हणाले, पुणे – बारामती प्रवास करताना पुणे कँप परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचचे जयंती बॅनर बघितले, हे वेदनादायी चित्र पाहुन प्रश्न पडतो ही चुक कुणाची मनपा ची,लावणाऱ्यांची की राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची??महापुरुष इतके स्वस्त झालेत का?ही विटंबना तत्काळ थांबवावी व ज्यांनी बॅनर लावलेत त्यांची सुद्धा याबाबत खबरदारी घ्यावी. मिटकरींनी आपले ट्विट पुणे महापालिकेलाही टॅग केले आहे. कपील पाटलांचा मनुस्मृतीवरून शरद पोंक्षेंवर हल्ला दुसरीकडे, विधान परिषदेचे माजी आमदार कपील पाटील यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मनुस्मृती विषयी केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, ‘मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नाही. वाचली असती तर ते जाळू शकले नसते’, असे अकलेचे तारे कुणी शरद पोंक्षेने तोडले. त्यांचं नावही घेण्याची खरी गरज नाही. पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर ते नथुरामी गरळ ओकायचे. आता तर त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर थेट हल्ला चढवला. पण आंबेडकर हे नुसतं रसायन नाही. कधीकाळी निद्रिस्त असलेला दलित समाज आता आंबेडकरी विचारांचा ज्वालामुखी बनला आहे. त्याचे चटके लागल्याबरोबर पोक्षांनी माफी मागून टाकली आहे. पण त्यांचा पीळ गेलेला नाही. मनुस्मृतीवरची श्रद्धा मिटलेली नाही. तसे ते एकटेच नाहीत एरव्ही पुरोगामी चेहरा घेणाऱ्यांच्या नेणीवेतही मनूची स्मृती लपलेली असते. ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधी चवदार तळ्याचा सत्याग्रह (20 मार्च 1927) करून आणि नंतर मनुस्मृतीचे दहन (25 डिसेंबर 1927) करून भारतात महाक्रांती घडवली. त्या क्रांतीचे बापूसाहेब सहस्रबुद्धे केवळ साक्षीदार नव्हते. भागीदार होते. गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे विचाराने गांधीवादी समाजवादी. सोशल सर्व्हिस लीगचे सक्रिय पदाधिकारी. बाबासाहेबांच्या समता संघातही ते सामील झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाडच्या सत्याग्रहात अनेक समाजवाद्यांनी साथ दिली. सुरबानाना टिपणीस, बापूसाहेब सहस्रबुद्धे, फतेह खान, अनंत चित्रे, महादेवशेठ थरवळ हे सगळेच सामील होते. साने गुरुजी, एस. एम. जोशी यांच्या सोबतीने 1941 मध्ये राष्ट्र सेवा दलाचं पुनर्गठन झालं. त्यात सहभागी असलेली ही मंडळी सुरवातीपासून बाबासाहेबांची सहकारी होती आणि अखेरपर्यंत राहिली. मनुस्मृती जाळली ती बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचं एक – एक पान सहस्रबुद्धे यांच्या हातात देत होते. बापूसाहेब सहस्रबुद्धे त्याचा अर्थ उपस्थितांना सांगत होते आणि सर्वांच्या साक्षीने ते पान अग्नीकुंडात टाकत होते. मनुस्मृती का जाळली पाहिजे ? हे बापूसाहेबांनी अर्थानिशी पटवून दिलं होतं. बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्यासारखे अनेक पुरोगामी ब्राम्हण, सारस्वत, कायस्थ ही कथित उच्चभ्रू जातीतली मंडळी त्या सत्याग्रहात सामील झाली होती. डी कास्ट होणं म्हणजे काय हे त्यांनी शिकवलं, असे कपील पाटील म्हणाले.
