आता गॅस एजन्सीला फेऱ्या मारण्याची गरज नाही:लाखांदूरच्या तरुणाने पाण्याची टाकी अन् ट्रॅक्टरच्या ट्युबच्या मदतीने बनवला बायोगॅस
![]()
आखातातील युद्धामुळे सध्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ग्रामीण भागात तर अनेकदा गॅसचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न उभा ठाकला असतानाच, भंडारा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने आपल्या कल्पक बुद्धीने सर्वांना चकित केले आहे. जितेंद्र हरिदास आठोळे (३५, रा. पाहुनगाव, ता. लाखांदूर) या युवकाने घरच्या घरी ‘बायोगॅस’चा असा काही यशस्वी प्रयोग केला आहे की, आता त्याला गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. जितेंद्र आठोळे यांनी हा प्रयोग अत्यंत साध्या आणि कमी खर्चात पूर्ण केला आहे. त्याने यासाठी बाजारातून कोणतेही महागडे यंत्र आणले नाही. आपल्याकडील ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत त्याने शेण आणि पाण्याचे मिश्रण (गोबर) टाकले. या मिश्रणातून नैसर्गिकरीत्या गॅस तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, हा गॅस साठवून ठेवण्याचे आव्हान जितेंद्रसमोर होते. त्यावर त्याने एक देशी जुगाड शोधून काढला. त्याने या टाकीला एक पाईप जोडून तो थेट ट्रॅक्टरच्या ट्युबला जोडला. टाकीत तयार होणारा गॅस या ट्युबमध्ये साठवला जातो. जेव्हा स्वयंपाक करायचा असतो, तेव्हा या ट्युबचा दुसरा पाईप शेगडीला जोडला की, निळ्या रंगाची ज्योत पेटते. महागाईच्या काळात ‘आठोळे पॅटर्न’ची चर्चा सध्या सर्वत्र गॅसचा तुटवडा असल्याने अनेक कुटुंबांना नाइलाजास्तव पुन्हा जंगलात लाकूड फाटा गोळा करायला जावे लागत आहे. धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशा काळात जितेंद्रने शोधलेला हा मार्ग अत्यंत पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणारा ठरला आहे. या प्रयोगामुळे त्याच्या कुटुंबाची गॅसच्या समस्येतून कायमची सुटका झाली असून, ते आता याच बायोगॅसवर रोजचा स्वयंपाक करीत आहेत. ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल जितेंद्र आठोळे यांच्या या प्रयोगाची माहिती मिळताच पाहुनगाव आणि परिसरातील नागरिक त्यांचा हा ‘बायोगॅस प्रकल्प’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. “गरज ही शोधाची जननी आहे,” ही म्हण जितेंद्रने सार्थ ठरविली आहे. केवळ ३५ वर्षांच्या या तरुणाने दाखवून दिले आहे की, जर इच्छाशक्ती असेल तर आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता आपल्याकडील उपलब्ध साधनसामग्रीतूनही आपण मोठी क्रांती घडवू शकतो. ”गॅसचे दर सतत वाढत आहेत आणि वेळेवर सिलिंडरही मिळत नाही. त्यामुळे मी घरच्या घरी हा प्रयोग करण्याचे ठरवले. ५०० लिटरची टाकी आणि जुनी ट्युब वापरून आज माझ्या घरचा स्वयंपाक सुलभ झाला आहे. इतर शेतकऱ्यांनीही असा प्रयोग केल्यास इंधनाचा खर्च वाचू शकतो,” अशी भावना जितेंद्र हरिदास आठोळे यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.
