३७ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा:स्नेहसंमेलनातून गीत गायन अन् मदतीचा हातसुद्धा; माजी शिक्षकांची उपस्थिती
![]()
प्रतिनिधी | मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात १९८८ ते २००१ या काळात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसम्मेलन आयोजित करण्यात आले होते. तब्बल २५ ते ३७ वर्षांआधी ज्या महाविद्यालयात आपण शैक्षणिक धडे घेतले, त्याच महाविद्यालयात आजच्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांन ी वर्ग भरविला. तत्कालीन प्राध्यापकांसह हितगुज करीत या मंडळीने महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. महाविद्यालयातील वर्गात हितगुज केल्यानंतर सर्वांनी सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणस्थळी असलेल्या झिरो प्वाईंट या हॉटेलमध्ये विविध स्पर्धात्मक कार्यक्रमही घेतले. त्यावेळी विद्यार्थी असलेल्या अनेक जण सध्याचे यशस्वी उद्योजक, अधिकारी, कर्मचारी आहेत. या सर्वांनी आपापसांत विचारांची देवाण-घेवाण करुन एकदुसऱ्यासोबतच महाविद्यालयाला कशी मदत करता येईल, याबाबतचे नियोजन केले. स्नेहमिलन सोहळ्यातून जिव्हाळा जपल्या जातो. जुन्या स्मृतींना उजाळा दिल्या जातो. यासाठी दिवसभर ‘तेरे जैसा यार कहाँ’, ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’… अशा प्रकारची गाणी गायली गेली. काहींनी विविध प्रकारचे खेळ, आणि नृत्य सादर करीत आनंद घेतला. त्यामुळे अख्खा दिवस कसा गेला, हे कळलेच नाही, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या. या अविस्मरणीय कार्यक्रमाला दर्शन रावणगावकर, संतोष भेलाऊ, राजेश घोडकी, मनोहर चौधरी, गजानन वानखडे, रवींद्र इंगळे (अमरावती), ॲड पवन अकर्ते, हेमंत साबू, विनोद मेश्राम, दीपक ठाकूर, योगेश वानखडे (सौदी अरेबिया), दुर्गा ठक्कर (मुंबई), रूपाली मेश्राम (चंद्रपुर) आदींनी हजेरी लावली होती. काहींची धुरंदर एंट्री यावेळी मित्रांचा आनंद ओसंडून वाहत होता. काही मित्रांच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले तर काही मित्रांनी धुरंदर फ़िल्म स्टाइलने एंट्री केली हा क्षण एवढा आनंदी होता की तो गगनात मावेनासा झाला. दरम्यान एकमेकांचा निरोप घेतांना पुन्हा भेटूया.. म्हणत सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याचा मानस व्यक्त केला. हा क्षण एवढा भावनिक होता की काही मित्रमंडळी गहिवरली. शेवटी सर्वांनी एकमेकांना निरोप देत स्नेहमिलन सोहळ्याची सांगता करण्यात आली.
