नाशिकच्या रवींद्र एरंडेच्या अडचणी वाढणार:87 अश्लील व्हिडिओ अन् 8 महिलांचे शोषण; नोकरीचे आमिष दाखवून केले अत्याचार
![]()
नाशिकमधील सातपूर परिसरातील अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, मुख्य संशयित तथाकथित पत्रकार रवींद्र एरंडे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चार मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत 8 पीडित महिलांची ओळख पटवण्यात यश आले असून, जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीवर आणखी गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाचा उलगडा अत्यंत नाट्यमयरीत्या झाला असून, सुरुवातीला स्वतःला पीडित भासवणाऱ्या रवींद्र एरंडेनेच चार जणांविरुद्ध 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून चौघांना अटक केली खरी, मात्र तपासादरम्यान एरंडेच्या स्वतःच्या टॅबमध्ये तब्बल 87 अश्लील व्हिडिओ आढळून आल्याने तपासाला वेगळेच वळण मिळाले. खंडणीचा बनाव रचणाऱ्या तक्रारदाराचाच खरा आणि विकृत चेहरा समोर आल्याने पोलिसांनी अखेर त्यालाच बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तोच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एरंडेकडून 4 मोबाइल, 2 पेनड्राइव आणि 1 मेमरी कार्ड जप्त पोलिसांनी एरंडेकडून 4 मोबाइल, 2 पेनड्राइव आणि 1 मेमरी कार्ड जप्त केले आहे. तसेच त्याचे ऑफिसवर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. या मोबाइलमधील डिलीट केलेला डेटा सायबर तज्ञांकडून रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. आरोपी एरंडेने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते. तपासात आतापर्यंत 8 पीडित महिलांची ओळख पटवण्यात आली आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. एरंडेकडून मिळवलेले हे अश्लील व्हिडिओ फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जात होते की त्यांची ब्लू फिल्म म्हणून विक्री केली जात होती, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. विशेष म्हणजे नाशिक आणि इगतपुरीच्या विविध हॉटेलमध्ये हे चित्रीकरण करण्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. रवींद्र एरंडेला आज न्यायालयात हजर करणार अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित रवींद्र एरंडेची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्याला दुपारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे आणि या रॅकेटमध्ये त्याचे इतर कोणी साथीदार सहभागी आहेत का, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस न्यायालयाकडे त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची दाट शक्यता आहे.
