देवेंद्र फडणवीसांनी बिनविरोधचा पॅटर्न बदलला:महाराष्ट्रातली संवेदनशीलता भाजपच्या काळात मारून टाकली- संजय राऊत
![]()
बारामती पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या अर्ज भरणार आहेत. बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतर हाके यांनी माघार घेतली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार दिला आहे. या सगळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोधचा पॅटर्न बदलला आहे. तसेच महाराष्ट्रातली संवेदना भाजपल्या काळात मारून टाकली असल्याची टीका राऊत यांनी केली. संजय राऊत म्हणाले, सुनेत्राताई पवार यांनी स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. तिकडे कॉंग्रेसने उमेदवार उभा केल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवारांची आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, ही चर्चा आम्हाला पाठिंबा द्या यासाठीच असणार. अशाच प्रकारचा फोन त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनाही केला. छगन भुजबळ आणि त्यांचे काही नेते शरद पवारांनाही भेटले. त्यामुळे हा निर्णय उद्धव ठाकरेंचाच नाही. बारामती हा पवारांचाच गड आहे, तिथे काय निकाल लागणार हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु, राजकारणात निवडणुकांत काही विषय असतात ते सामोपचारानेच घ्यावे लागतात. आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत, निवडणुकांना वेळ आहे. बिनविरोध पॅटर्नला कॉंग्रेसचा विरोध पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कॉंग्रेसने उमेदवार दिला आहे. आत्ता अर्ज भरला आहे मग अर्ज मागे घ्यायची वेळ येते, मग निवडणुकांचा प्रचार होणार. तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे का? नाही. शरद पवारांचा उमेदवार आहे का? नाही. परंतु, महाविकास आघाडीमधला प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने तिथे उमेदवार घोषित केला आहे. कॉंग्रेसची एक भूमिका आहे की शक्यतो बिनविरोध निवडणुका होऊ नयेत. असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा केला आहे. नांदेडला कॉंग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण वारले. तेव्हा आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी तिथे उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते तिथे प्रचार करण्यासाठी आले. पंढरपूरला भालके नानांचे निधन झाले, पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी उभ्या होत्या. आम्ही सगळ्यांना विनंती केली की बिनविरोध व्हावी. काय झाले? देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला. जेव्हा त्यांची सोय असते तेव्हा ते बिनविरोध होऊ द्या म्हणतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्या काळात महाराष्ट्रातली संवेदना मारून टाकली संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोधचा पॅटर्न जो आहे तो बदलला आहे. पूर्वी या महाराष्ट्रात एक संवेदनशीलता होती. भाजपच्या काळात ही संवेदना मारून टाकली. नाहीतर एकमेकांशी आम्ही अशा प्रकारची नाती संगळ्यांनीच जपली होती. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आणि देशात शहा मोदी यांचे राज्य आल्यापासून देशातली आणि महाराष्ट्रातली संवेदना पूर्णपणे मारली गेली. तरीही आजही आम्ही एकमेकांशी बोलत असतो. पुढे एकमेकांशी बोलत आहेत म्हणून ईडी लावतील, अशी खोचक टीकाही राऊत यांनी केली.
