जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपसह ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त:दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
![]()
हिंगोली ते वाशीम मार्गावर अकोला बायपास जवळ हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनासह ४.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर रविवारी ता. ५ रात्री उशीरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूुसार, हिंगोली कडून पिकअप वाहनामध्ये तीन बैल दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक भालचंद्र मेथेकर, जमादार बाळासाहेब खोडवे, विश्वास कुटे, अनिल डुकरे, आशिष उंबरकर, रमेश जाधव यांच्या पथकाने हिंगोली ते वाशीम मार्गावर रविवारी सायंकाळी वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी पोलिसांनी एक पिकअप वाहन थांबविल्यानंतर त्यात तीन बैल आढळून आले. पोलिसांनी चालक शेख वाहिद शेख मुक्तार (रा. बागवानपुरा वाशीम), शेख मुजीब अहेमद (रा. खडकपूरा हिंगोली) यांची चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये त्यांनी जनावरांच्या वाहतुकीचा परवाना व इतर कागदपत्रांबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र नसतांनाही जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी पीकअप वाहन व तीन बैल असा सुमारे ४.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी जमादार कुटे यांच्या तक्रारीवरून शेख वाहिद व शेख मुजीब या दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी तीनही बैल गोशाळेत पाठविण्याची तयारी चालवली आहे.
