एका दिवसाच्या मोहिमेत दारूच्या भट्ट्यांवर छापे, ७५ गुन्हे दाखल:पोलिसांचे ऑपरेशन प्रहार, जिल्ह्यात ८ लाखांची दारू केली नष्ट
![]()
प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार” सुरू केले आहे. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ ते रात्री १२ या वेळेत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हाभरातील ७५ ठिकाणी अवैध दारू विक्री आणि बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवर छापे टाकण्यात आले. ही मोहीम जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांअंतर्गत राबवण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी बेकायदेशीर दारूच्या ४६ केसेस केले आणि २लाख ३ हजार ५६२ रुपये किमतीचा माल जप्त केला. बेकायदेशीर दारूच्या भट्ट्यांवरील २९केसेसच्या कारवाईत ५ लाख ९९ हजार ३७० रुपये किमतीचा माल जप्त करुन असा एकूण ७५ केसेसमध्ये सुमारे ८ लाख २ हजार ९३२ रूपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला, भट्ट्या पाडण्यात आल्या आणि कच्च्या मालाची विल्हेवाट लावण्यात आली. बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांतर्फे ही मोहीम राबवली जात आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की, अवैध दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, तसेच ग्रामीण भागातील शांतता भंग होऊन अशांतता पसरते. दारू गाळण्याच्या कारखान्यांविरुद्धची ही मोहीम जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. कोणत्याही गुन्हेगारी कृत्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी.
