सटाणा-नामपूर रस्त्यावर दोन झाडे कोसळली:वाहनचालकांना अडथळा, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
![]()
प्रतिनिधी |सटाणा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सटाणा-नामपूर रस्त्यालगत दोन ठिकाणी महाकाय वृक्ष कोसळले आहेत. हे वृक्ष रस्त्याच्या कडेला तसेच पडून असल्याने अपघाताची भीषण शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे पाठ फिरवल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सटाणा-नामपूर रस्त्यावरील कुपखेडा गावाजवळ आणि शीतगृहाजवळ अशा दोन ठिकाणी रस्त्यालगत झाडे कोसळली आहेत. ही झाडे रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर पडून असल्याने मूळ रस्ता अरुंद झाला आहे. कोसळलेल्या फांद्या आणि खोडामुळे समोरून येणारे वाहन वेळेत दिसत नाही, परिणामी येथे भीषण अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणे आवश्यक असताना, संबंधित यंत्रणेने अद्याप ही झाडे हटवण्याची तसदी घेतलेली नाही. या मार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना या झाडांचा अंदाज येत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने ही झाडे तातडीने बाजूला करावीत, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.
