संविधान हा सुशासनाचा रोड मॅप – प्रा. धनेधर:निधोना येथे विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळा
![]()
प्रतिनिधी | फुलंब्री भारतीय संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नसून तो एक जिवंत दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान हे खऱ्या अर्थाने सुशासनाचा रोड मॅप आहे, असे प्रतिपादन प्रा. किरण धनेधर यांनी केले. निधोना येथील प्रभात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पठाण एस. एच. हे होते. प्रा. धनेधर पुढे म्हणाले की, भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असून तो लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मानवी तत्त्वांवर आधारित आहे. हे संविधान नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते आणि सरकारची रचना व त्यांच्या मर्यादा स्पष्ट करते. देशातील विविधता जपून एकता व अखंडता राखण्याचे सामर्थ्य संविधानात असून, बदलत्या काळानुसार देशाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता यात आहे. डॉ. संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले.
